अजय देवगणच्या ‘दृश्यम’, इरफान खान यांच्या ‘मुंबई मेरी जान’ आणि ‘मदारी’, तसंच जॉन अब्राहमच्या ‘फोर्स’ आणि ‘रॉकी हँडसम’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते म्हणजे दिवंगत निशिकांत कामत. केवळ बॉलीवूडच नव्हे तर अनेक मराठी चित्रपटांचेही त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. मराठी चित्रपटांमध्ये ‘डोंबिवली फास्ट’ व्यतिरिक्त त्यांनी रितेश देशमुख आणि राधिका आपटे यांना घेऊन ‘लय भारी’ तसंच ‘फुगे’ अशा काही हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले. आपल्या दिग्दर्शनाने सर्वांना चकित करणाऱ्या या दिग्दर्शकाने २०२० मध्ये सर्वांचा निरोप घेतला.
निशिकांत यांना लिव्हर सिरोसिस हा आजार होता. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचारही सुरू होते. परंतु, त्यांची मरणाशी झुंज अपयशी ठरली आणि १७ ऑगस्ट २०२० साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलीवूड व मराठी कलाकारांनी दु:ख व्यक्त केलं होतं. आजही अनेक कलाकार मंडळी त्यांच्या आठवणीत व्यक्त होत असतात. अशातच अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकने दिवंगत निशिकांत कामत यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रसादच्या आगामी ‘सुशीला-सुजीत’ या चित्रपटाचा म्युझिक लाँच सोहळा रुईया महाविद्यालयात पार पडला.
राजश्री मराठीने शेअर केलेल्या या व्हिडीओत प्रसादने निशिकांत यांच्याबरोबरची आठवण सांगताना म्हटलं की, “सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅमेरा या गोष्टीशी माझी ज्या व्यक्तीमुळे ओळख झाली किंवा कॅमेऱ्यासमोर ज्या व्यक्तीमुळे मी काम करायला लागलो, ती व्यक्ती रुईयाची आहे. त्या व्यक्तीचे नाव म्हणजे निशिकांत कामत. निशिकांतमुळे मी आयुष्यात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभा राहिलो आणि आज निशिकांतच्या कॉलेजमध्ये आम्ही निर्माण करत असलेल्या पहिल्या चित्रपटाचे प्रमोशन सुरू होत आहे, ही माझ्यासाठी भावनिक आणि तितकीच अभिमानास्पद गोष्ट आहे.”
यापुढे त्याने म्हटलं की, “आज निशिकांत असता तर त्याला प्रचंड आनंद झाला असता. मी आणि मंजू (मंजिरी ओक) आम्ही दोघे त्याच्यामुळेच कॅमेऱ्यासमोर उभे राहिलो”. दरम्यान, ‘सुशीला-सुजीत’च्या म्युझिक लाँच सोहळ्यात गश्मीर व अमृताने ‘चिऊताई-चिऊताई’ या गाण्यावर लाइव्ह परफॉर्मन्स सादर करत सर्वांची मनं जिंकली. येत्या १८ एप्रिल २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.