बॉलीवूडसह मराठी बॉक्स ऑफिसवर सध्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाची जोरदार चर्चा चालू आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, त्यांचं राजकीय व सामाजिक कार्य मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रणदीप हुड्डाने केलं असून यामध्ये त्यानेच वीर सावरकरांची मुख्य भूमिका साकारली आहे. नुकताच हा चित्रपट मराठीत सुद्धा प्रदर्शित करण्यात आला.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे याने रणदीप हुड्डाने साकारलेल्या वीर सावरकरांच्या भूमिकेला आवाज दिला आहे. त्यामुळे रसिकप्रेक्षकांना आता चित्रपट मराठीत पाहण्याची संधी मिळणार आहे. या चित्रपटाच्या मराठी प्रीमियरला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. अंकिता लोखंडे व रणदीप हुड्डा यांच्यासह अमृता खानविलकर, प्रसाद ओक त्याची पत्नी मंजिरी असे सगळेजण चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला हजर होते.
हेही वाचा : “पुन्हा रिअॅलिटी शो करणार नाही”, मानसी नाईकने सांगितला अनुभव; म्हणाली, “अभिनेत्रींमध्ये भांडणं, गॉसिप…”
चित्रपट पाहिल्यावर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने खास पोस्ट शेअर केली आहे. प्रसाद लिहितो, “‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ अप्रतिम चित्रपट! अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारपूर्वक केलेली मांडणी, अतिशय संयत अभिनय, उत्तम पटकथा, देखणं छायाचित्रण, परिणामकारी पार्श्वसंगीत…रणदीप हुड्डा-अंकिता लोखंडे आणि संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन!”
“चित्रपट आता मराठीत सुद्धा प्रदर्शित झाला आहे. आमचे मित्र सुबोध भावे यांनी वीर सावरकरांना आवाज दिलेला आहे. कोणत्याही खोट्या पोस्टकडे लक्ष देऊ नका. चित्रपट उत्तम प्रतिसादात चालू आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा सावरकरांना त्रिवार वंदन जय हिंद!” अशी पोस्ट प्रसाद ओकने शेअर केली आहे.
दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित झाला होता. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुड्डाने प्रचंड मेहनत घेत तब्बल ३० किलो वजन कमी केलं होतं. याशिवाय चित्रपटासाठी घर विकल्याचं त्याने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं.