अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘ड्रामा ज्युनियर्स’ या कार्यक्रमात संकर्षण कऱ्हाडेबरोबर परीक्षकाची भूमिका निभावत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच ती अनेकदा तिच्या चित्रपटांतील भूमिकांमुळे चर्चेत असते. उत्तम नृत्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. आता अमृता खानविलकर व आशीष पाटील यांच्या ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ या कार्यक्रमाला अभिनेते प्रसाद ओक व रवी जाधव यांनी हजेरी लावत या कार्यक्रमाविषयी त्यांनी आपले मत मांडले आहे.
प्रसाद ओक काय म्हणाला?
अभिनेता प्रसाद ओक या कार्यक्रमाविषयी बोलताना म्हणतो, “खरं तर ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’पेक्षा ‘पॉवर ऑफ स्त्री’, असं जर या कार्यक्रमाचं नाव ठेवलं असतं, तर ते जास्त योग्य वाटलं असतं. पण हा अप्रतिम कार्यक्रम आहे.” पुढे प्रसाद ओकने या कार्यक्रमाचे कौतुक करताना म्हटले, “या कार्यक्रमामध्ये भयंकर शक्ती आहे. काहीतरी भव्य आहे, वेगळं काहीतरी अनुभवल्याचं समाधान मिळालं. अमृता, आशीष आणि सगळ्याच डान्सर धमाकेदार परफॉर्म्स करतात. त्यामुळे फार मजा आली. वेशभूषा, दागिने उत्तम आहेत आणि लाइट्स, म्युझिक फार अप्रतिम आहे. सगळंच लाजवाब आहे. हा पाहायलाच पाहिजे असा शो आहे.” असे म्हणत प्रसादने अमृताच्या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
प्रसाद ओकबरोबर दिग्दर्शक रवी जाधव यांनीदेखील ‘वर्ल्ड ऑफ स्त्री या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले, “खूप मस्त कार्यक्रम आहे. मला खूप आवडला. मला वाटतं की, ९० मिनिटांचा कार्यक्रम आहे आणि त्या वेळेत प्रत्येक मिनिटाला टाळ्या वाजत होत्या इतका हा सुंदर कार्यक्रम आहे. असे काही क्षण होते, ज्यावेळी अंगावर काटा आला. अमृता, आशीष आणि संपूर्ण टीम यांनी खूप छान काम केले आहे. म्युझिक उत्तम आहे. स्त्रीची वेगवेगळी रूपं आपल्यासमोर वेगवेगळ्या पद्धतीनं येतात. याचे भरपूर शो व्हावेत.” अशा शुभेच्छा देत त्यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे.
हेही वाचा: फोटो फाडून रद्दीत फेकायचे…; ‘बिग बॉस’च्या घरात पार पडणार नॉमिनेशन टास्क, पाहा जबरदस्त प्रोमो
दरम्यान, अमृता खानविलकर तिच्या नृत्यासाठी प्रसिद्ध आहे. तिची अनेक गाणी लोकप्रिय झालेली पाहायला मिळतात. त्याबरोबरच अमृता सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि रीलच्या माध्यमातून ती प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असल्याचे पाहायला मिळते.