‘रमा माधव’, ‘शुगर सॉल्ट आणि प्रेम’, ‘शिकारी’, ‘फर्जंद’, ‘ये रे ये रे पैसा २’, ‘हिरकणी’, ‘धुरळा’, ‘धर्मवीर’, ‘धर्मवीर २’ अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे प्रसाद ओक हा होय. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत दिवंगत लोकप्रिय अभिनेते निळू फुले यांची एक आठवण सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसाद ओकने नुकतीच ‘व्हायफळ’ या यूट्यूब पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने निळू फुले यांची एक आठवण सांगितली आहे. प्रसाद ओकने म्हटले, “अवघाचि संसार ही माझी मालिका चालू होती. ती मालिका प्रचंड गाजली होती. त्यात मी अत्यंत दुष्ट माणूस होतो. खलनायकाची भूमिका करत होतो, तर निळू भाऊंच्या एका चित्रपटाचं शूटिंग होतं १५ दिवस, ते अचानक कॅन्सल झालं. गार्गीच्या आई ती मालिका बघायच्या. गार्गीच्या आईने टीव्ही लावला. भाऊंनी विचारलं, कोण आहे गं? प्रसाद आहे का? त्या म्हटल्या, हो. भाऊ म्हणाले, अरे वाह!बसतो बघायला. असं म्हणून भाऊंनी एक एपिसोड बघितला. १५ दिवस भाऊंचं शूटिंग बंद होतं, त्यामुळे १५ दिवस भाऊ रोज एपिसोड बघत होते. सोळाव्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले, प्रसाद, तुझी ती मालिका चालू आहे त्याचे १०-१५ भाग मी पाहिले. तुझं मला फार कौतुक वाटलं. खलनायक मीही केलाय, बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने केला आहे. टेलिव्हिजनवर कधी खलनायकाची भूमिका साकारली नाही. तू साकारलेली खलनायकाची भूमिका मी पाहिली. माझ्या लक्षात आलं, त्याच तीव्रतेने दररोज खलनायक साकारणे ही अवघड गोष्ट आहे. तू फार उत्तमरित्या केलं आहेस.”

“मला असं वाटतं की मला त्याच वेळेला ऑस्कर मिळाला आहे. ज्या माणसाला मी देवासारखा मानतो, मी गुरू मानतो, त्या माणसाने माझं काम १५ दिवस बघणं आणि हे मला फोन करून सांगणं हा किती मोठेपणा आहे. ही खूप शक्ती देणारी गोष्ट आहे. मला त्याच्यामुळे इतकी ऊर्मी आली, पुढे दोन वर्षे मालिका सुरू होती; मी त्याच तीव्रतेने काम करत होतो. केवळ त्यांच्या एका फोनमुळे. मी जितकं भाऊंबद्दल बोलेन तितकं कमी आहे. साताऱ्याजवळ हायवेला त्यांचा एक फोटो आहे, ‘मोठा माणूस’ असं खाली लिहिलं आहे. ते १०० टक्के खरं आहे. फार मोठा माणूस होता.”

हेही वाचा: ‘धर्मवीर २’ नंतर ‘येक नंबर’ घरबसल्या पाहता येणार, कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होतोय चित्रपट? वाचा

दरम्यान, प्रसाद ओक लवकरच ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या आयुष्यावर बायोपिकच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते निळू फुले हे त्यांच्या हटके अभिनय आणि डायलॉगसाठी ओळखले जातात. आजही त्यांच्या अभिनयाची चर्चा होताना दिसते. आता या बायोपिकमध्ये त्यांची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak recalled phone call from nilu phule for appreciation of his work nsp