मराठी मनोरंजनसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक असलेला आघाडीचा कलाकार म्हणजे प्रसाद ओक. प्रसादने आपल्या अभिनयाच्या जोरावर या सिनेसृष्टीत स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. अभिनयाबरोबर दिग्दर्शनाने प्रसादने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. असा हा लोकप्रिय अभिनेता सध्या कुटुंबीयांबरोबर परदेशात आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सोशल मीडियावर परदेशातील काही फोटो शेअर करत आहे. नुकताच प्रसादने त्याच्यासाठी असलेला अभिमानस्पद क्षण चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
अभिनेता प्रसाद ओकला मयांक आणि सार्थक ही दोन मुलं आहेत. यापैकी एक मुलगा म्हणजे सार्थक परदेशात आहे. नुकताच त्याचा पदवी प्रदान समारंभ पार पडला. याचा व्हिडीओ प्रसादने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये सार्थकचा पदवी प्रदान समारंभ पाहायला मिळत आहे. यावेळी सार्थक जेव्हा पदवी स्वीकारण्यासाठी जातो तेव्हा आई म्हणजे मंजिरी ओक आनंदात ओरडते आणि ‘लाय लव्ह यू’ असं म्हणताना दिसत आहे.
लेकाचा हा व्हिडीओ शेअर करत प्रसाद ओकने लिहीलं आहे, “सार्थकचा “पदवी प्रदान समारंभ”…सार्थक…आम्हा सगळ्यांपासून खूप लांब राहून शिक्षण घ्यायचा निर्णय तू अत्यंत धाडसानी घेतलास… खूप कष्ट केलेस… खूप अभ्यास केलास…आज हे क्षण पाहताना तुझ्या निर्णयाचं आणि कष्टांचं चीज झालं असं मनापासून वाटतंय. तुझ्या पुढच्या प्रवासाला अगणित शुभेच्छा…”
हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने बहिणीच्या लग्नातले खास फोटो केले शेअर; म्हणाला, “अमृता खूप…”
तसेच मंजिरी ओकने देखील काही फोटो शेअर केले आहेत आणि लिहीलं, “कमाल क्षण, कमाल अनुभव, कमाल भावना…आयुष्याचं #सार्थक झालं..”
प्रसाद आणि मंजिरी ओकची पोस्ट पाहून कलाकार मंडळीसह चाहते सार्थकचं कौतुक करून त्याला शुभेच्छा देत आहेत. अमृता खानविलकर, सुबोध भावे, स्वप्नील जोशी, अभिनय बेर्डे, क्रांती रेडकर अशा अनेक कलाकारांनी सार्थकचं अभिनंदन केलं आहे.