मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखलं जातं. चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाबरोबरच प्रसाद एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे. येत्या काळात त्याने दिग्दर्शित केलेले अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसादने २०१७ मध्ये दिग्दर्शन केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा पटकावला होता. या चित्रपटाबद्दलच्या आठवणी प्रसादने नुकत्याच कॉकटेल स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत सांगितल्या आहेत.

हेही वाचा : अनुष्का शर्माच्या वाढदिवशी विराट कोहलीची खास पोस्ट; पत्नीबद्दल म्हणाला, “माझ्या आयुष्यात तू नसतीस तर…”

प्रसाद सांगतो, “‘कच्चा लिंबू’ हा माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा भाग आणि घटक आहे याला मी चित्रपट नाही म्हणणार कारण, या कलाकृतीने मला खूप काही दिलं आहे. अर्थात यामुळे आयुष्यातील अनेक गोष्टी गेल्या. पण, हाच एक प्रवास आहे. ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है’ आपण म्हणतो ना अगदी तसंच झालं. तो चित्रपट एक ते दोन आठवडे अगदी कसाबसा चालला. त्यानंतर तो चित्रपट उतरला. पण, त्या माझ्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. असं भाग्य कोणत्या दिग्दर्शकाच्या नशिबात असतं? हा चित्रपट मी फार वेगळ्या विचाराने केला होता. विशेष मुलांकडे पाहण्याचा समाजाचा असलेला दृष्टीकोन कसा बदलला पाहिजे, एखाद्या सण-समारंभात लोक त्या मुलाकडे कशा पद्धतीने बघतात. लोकांच्या त्या नजरेचा संबंधित मुलाच्या आई-वडिलांना भयंकर त्रास होत असतो. त्यामुळे ही विशेष मुलं समारंभाला येत नाहीत. कालांतराने पालकही अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. पण, तो मुलगा तसा आहे यात त्या मुलाचा काय दोष? विशेष मुलांच्या आई-बाबांना प्रचंड भोगावं लागतं. त्यामुळे आपल्या समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी अत्यंत प्रामाणिक हेतूने मी हा चित्रपट बनवला होता.”

हेही वाचा : ‘कलर्स मराठी’वर सुरू होणार ‘अबीर गुलाल’! गायत्री दातारचं पुनरागमन, तर जोडीला असेल ‘बापल्योक’ फेम अभिनेत्री, पाहा प्रोमो

प्रसाद पुढे म्हणाला, “प्रत्येक चित्रपटासाठी मी मेहनत घेत असतो. त्यात काही मोठेपणा नाही. पण, त्या चित्रपटासाठी मी जवळपास पावणेदोन वर्ष मेहनत घेतली होती. त्या काळात मी काहीच इतर काम केलं नाही. आपण काहीच काम केलं नाही… हे तेव्हा लक्षात आलं जेव्हा कर्जाचे हप्ते जास्त झाले आणि बँकेच्या माणसांचे फोन येऊ लागले. तेव्हा लक्षात आलं…अरे आपण काही कमावलेलंच नाहीये. पण, आपण काही कमावलं नाही म्हणून बँकेचे हप्ते थांबत नाहीत ते चालूच राहतात.”

“त्या दोन वर्षात काम न करणं एवढं गळ्याशी आलं की, पुण्यामध्ये मी एक छान टुमदार असं रो-हाऊस मी घेतलं होतं. ते घर खूपच सुंदर होतं. माझ्या बायकोने ते घर स्वत:च्या हातांनी शेणाने सारवलं होतं. त्या घरातील एक-एक ताट, वाटी, भांडी सगळ्या गोष्टी पितळेच्या होत्या. तिने फार शोधाशोध करून ते सगळं शोधून आणलं होतं. त्या घरात स्टिलच्या वस्तू नव्हत्या. अगदी फ्रिज सुद्धा मातीचा आणला होता. समोर बैलगाडी बनवली होती, मागे खोटी विहीर, मोट होती. त्या घरात आम्ही दोन वर्षे पुण्याला जाऊन-येऊन राहिलो. पण, ‘कच्चा लिंबू’च्या प्रवासात ती दोन वर्षे काम न केल्यामुळे मला नाईलाजास्तव ते घर विकावं लागलं. ते घर विकून मी माझ्या बायकोच्या आनंदावर विरजण टाकलं. खरंतर मला तो अधिकार नव्हता. एखादी कलाकृती खूप सुंदर व्हावी म्हणून मी इतर काही काम न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला माझ्या बायकोची पूर्ण संमती होती पण, शेवटी नाईलाज म्हणून मला तिच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं आणि आम्ही ते घर विकलं.” असं प्रसाद ओकने सांगितलं.

हेही वाचा : “अत्यंत थर्ड क्लास…”, इन्फ्लुएन्सर्सना ‘अ‍ॅक्टर्स’ समजण्याबाबत प्रसाद ओकने मांडलं स्पष्ट मत, म्हणाला…

प्रसाद पुढे म्हणाला, “आज ते घर माझ्या हातात नाहीये. माझं घर गेलं पण, त्याच ‘कच्चा लिंबू’ चित्रपटाने मला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. तो आनंद जर तराजूत टाकला ना…तर दोन्ही पारडी सारखी आहेत. एका प्रामाणिक कलाकाराला पहिल्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळणं आणि दुसरीकडे घर या दोन्ही गोष्टींचं मूल्य माझ्यासाठी सारखं होतं. पण, शेवटी घर गेलं. चित्रपटाचं अनेक मान्यवरांनी कौतुक केलं…जगभरात अनेक फेस्टिव्हल्समध्ये त्या चित्रपटाचे शो दाखवण्यात आले होते. समीक्षकांच्या दृष्टीकोनातून तो अतिशय सुंदर चित्रपट होता पण, व्यावसायिकदृष्ट्या तो चित्रपट फ्लॉप ठरला.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prasad oak shared his first national award memories and talks about financial crisis sva 00