Prasad Oak Shared His Son Birth Incident : मनोरंजन क्षेत्रात काम करणं ही अगदी तारेवरची कसरतच असते. कलाकारांना अनेकदा त्यांच्या खऱ्या आयुष्यातील सुख-दु:ख बाजूला सारून प्रेक्षकांसाठी काम करावं लागतं. ‘शो मस्ट गो ऑन’ हा म्हणत ही कलाकार मंडळी चाहत्यांसाठी मनापासून काम करत असतात. मग खऱ्या आयुष्यात त्यांच्यावर कोणताही दु:खी किंवा आनंदी प्रसंग आलेला असो. असंच काहीसं झालं होतं अभिनेता प्रसाद ओकबरोबर. प्रसाद ओकला जेव्हा पहिला मुलगा झाला तेव्हा मालिकेत त्याच्या आईचं निधन झालं होतं. यामुळे त्याला आपल्या पहिल्या लेकाच्या जन्माचा आनंदही नीट साजरा करता आला नव्हता.
याबद्दल स्वत: प्रसाद ओकने एक प्रसंग सांगितला आहे. कलाकृती मीडियाशी बोलताना त्याने खऱ्या आयुष्यात मुलगा झाल्याचा आनंद असतानाही ‘वादळवाट’ मालिकेत आई गेल्याचा सीन असल्यामुळे तो आनंद व्यक्त करता आला नसल्याचे म्हटलं. यावेळी त्याने असं म्हणाला की, “माझ्या मोठ्या मुलाच्या वेळी मंजिरी जेव्हा गरोदर होती आणि डॉक्टरांनी तिची डिलिव्हरी डेट दिली होती. त्यामुळे मी त्या दिवशी शूटिंगसाठी जात नाही असं मंजिरीला म्हटलं आणि मी त्यादिवशी सुट्टी घेतली. मग १५ दिवसांनी आम्ही पुन्हा एकदा तपासणीसाठी गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले की, दिलेल्या तारखेला डिलिव्हरी होईल असं वाटत नाही.”
यानंतर प्रसादने सांगितलं की, “त्यामुळे मी मंजिरीला म्हटलं की, त्यादिवशी डिलिव्हरी होणार नसेल तर मी सुट्टी घेत नाही. म्हणून मग मी त्यादिवशी शूटींग घेतलं आणि तिची डिलिव्हरीची तारीख पुढे गेलीच नाही. डॉक्टरांनी दिलेल्या तारखेलाच मंजिरीची डिलिव्हरी झाली. कलाकारांचं आयुष्य कसं असतं बघा. इकडे मला मुलगा झाला. पहिला मुलगा झाला म्हणून मी प्रचंड आनंदात होतो आणि ‘वादळवाट’ मालिकेत मी माझ्या आई गेल्याचा सीन करत होतो. तेव्हा मला माझा आनंद रोखून ठेवावा लागला होता, कारण मालिकेत माझी आई गेली होती.”
यापुढे त्याने म्हटलं की, “पण अशावेळी तुमचे मित्रच धावून येत असतात. मी तेव्हा मुंबईत मढमध्ये शूटिंग करत होतो आणि मंजिरी तिकडे पुण्यात होती. रात्रीची शिफ्ट करून मुलाला पाहायला जायचं होतं आणि रात्रीचं शूटिंग केल्यामुळे मला गाडी चालवून पुण्याला जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी पुष्करला फोन केला. त्याला हे सगळं सांगितलं आणि तेव्हा पुष्कर माझ्या मदतीला आला आणि त्याने गाडी चालवली. आम्ही पुण्याला गेलो. मी मुलाला बघितलं आणि पुन्हा निघालो. कारण मला पुन्हा मुंबईला रात्रीच्या शूटींगसाठी यायचं होतं.”
दरम्यान, प्रसादने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. शिवाय त्याने ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ तसंच नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे. तर येत्या १ मे रोजी त्याचा अभिनेता म्हणून ‘गुलकंद’ नावाचा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात त्याच्याबरोबर अभिनेत्री सई ताम्हणकर, ईशा डे आणि समीर चौघुले हे कलाकार आहेत. हास्यजत्रेच्या यशानंतर वेटक्लाऊडने ‘गुलकंद’ या कौटुंबिक आणि विनोदी चित्रपटाची निर्मिती केली आहे.