शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात यशस्वी ठरला होता. चित्रपटाच्या पहिल्या भागाच्या यशानंतर आता या ‘धर्मवीर‘चा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान, ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच पार पडला. त्यानिमित्ताने आनंद दिघेंची भूमिका साकारलेल्या अभिनेता प्रसाद ओकने त्याला चित्रपट करताना काय अनुभव आला ते सांगितले आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीला अभिनेता प्रसादने नुकतीच मुलाखत दिली. त्यामध्ये त्याला या चित्रपटाचा पहिला भाग आणि दुसरा भाग यांच्यात वेगळेपण आहे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने प्रत्युत्तरादाखल देताना सांगितले, “पहिल्या इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाण्यासाठी आपण अभ्यास करतो आणि मग दुसरीतून तिसरीत जाण्यासाठी जास्त अभ्यास करतो. त्यानुसार ‘धर्मवीर’च्या भाग २ साठी निर्माते, दिग्दर्शकापासून प्रत्येक अभिनेता एकंदरीत आम्ही सगळ्यांनीच जास्त मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि त्याच्या दुप्पट प्रतिसाद दुसऱ्या भागाला मिळायला हवा यासाठी आम्ही दुप्पट मेहनत घेतली आहे. आता प्रेक्षकांच्या हातात सर्वकाही आहे, असे प्रसादने म्हटले आहे.
त्याबरोबरच ‘धर्मवीर’चा पहिला व दुसरा भाग प्रदर्शित होण्याच्या मधल्या काळात राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये बराच बदल झाला आहे. चित्रपटाच्या माध्यमातून काय संदेश द्यायचा आहे, या प्रश्नाला उत्तर देताना प्रसाद ओकने म्हटले की, मी याकडे फक्त अभिनेता म्हणून बघतो. दिलेल्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं मी महत्त्वाचं समजतो. चित्रपटातून काय संदेश द्यायचा आहे, हा सर्वस्वी लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रश्न आहे.
हेही वाचा: कंगना रणौतविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची न्यायालयाकडे मागणी
आनंद दिघेंची भूमिका साकारताना प्रचंड दडपण आल्याचे प्रसादने सांगितले आहे. तो म्हणतो, “अशी भूमिका साकारताना प्रचंड दडपण असतं. कारण- आनंद दिघेंना देव मानणारी अनेक कुटुंबं महाराष्ट्र अन् भारतात आहेत. शूटिंगच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी गेलेलो असताना खरोखर मी देव्हाऱ्यात आनंद दिघेंचा फोटो पाहिला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात ही व्यक्ती ज्या उंचीवर आहे, त्या माणसाची भूमिका करताना ती जबाबदारीने व विचारपूर्वक केली गेली पाहिजे. चित्रपटातून काय संदेश द्यायचा हा प्रश्न जरी लेखक-दिग्दर्शक यांचा असला तरी भूमिका त्या ताकदीने लोकांसमोर येण्यासाठी मी प्रचंड अभ्यास केला. ज्या त्रुटी माझ्याकडून पहिल्या भागात राहिल्या होत्या, त्या ‘धर्मवीर’च्या दुसऱ्या भागाच्या निमित्ताने दूर केल्या.” हिंदुत्वाविषयी प्रसाद ओक काय विचार करतो? याबद्दल त्याने म्हटले आहे, “आपल्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे, त्याच्याबद्दल विचार काय करायचा आहे. तो आपला धर्म, प्राण व श्वास असला पाहिजे; जो माझा आहे,” अशी स्पष्टोक्ती प्रसाद ओकने दिली आहे.
दरम्यान, हा चित्रपट मराठी भाषेसह हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे. ९ ऑगस्टला धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे २ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.