मराठी मालिका व चित्रपटांमधून प्रसाद ओकने गेली वर्षानुवर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनयाच्या जोडीने अनेक गाजलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाची धुरा देखील प्रसाद ओकने सांभाळली आहे. आता अभिनेत्याच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा लेक मयंक ओकने सुद्धा एकांकिकेचं दिग्दर्शन केलं आहे. याबद्दल मंजिरी ओकने पोस्ट शेअर करत लाडक्या लेकाचं कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसाद ओकचा मुलगा मयंक ओकने आपलं शिक्षण रुईया महाविद्यालयातून पूर्ण केलं आहे. गेली तीन-चार वर्षे तो या महाविद्यालच्या विविध एकांकिका स्पर्धांमध्ये काम करत असल्याचं मंजिरीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. आता नाट्यविश्वात एक पाऊल पुढे टाकत मयंकने ‘तक्रार’ या नाटकाचं दिग्दर्शन करत प्रकाशयोजनेची जबाबदारी सुद्धा सांभाळली. त्याच्या या नाटकाला पारितोषक सुद्धा मिळालं. लेकाला कौतुकाची थाप देण्यासाठी मंजिरी ओकने खास पोस्ट शेअर केली आहे.

प्रसाद ओकची पत्नी मंजिरी लिहिते, “जिथून माझा आणि प्रसादचा प्रवास एकत्र सुरू झाला ती गोष्ट म्हणजे ‘एकांकिका’. क्षेत्र कोणतंही असो… पाया पक्का असायलाच हवा आणि आमच्या क्षेत्रातला पाया म्हणजे ‘एकांकिका’. आज आमच्या मयंकची सुद्धा याच क्षेत्रात येण्याची इच्छा आहे आणि त्याचा पाया सुद्धा त्याने स्वत:च भक्कम केला याचा आनंद आहे.”

“रुईया महाविद्याकडून गेली ३ ते ४ वर्षे मयंक वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत होता. पण, आता कॉलेज संपत आलं असताना… लेखक शंकर पाटील यांच्या कथेवर प्रेरणा घेऊन मयंकच्या मित्रांनी एक एकांकिका लिहिली आणि मयंकने स्वतः ती एकांकिका दिग्दर्शित केली. त्याची प्रकाशयोजना सुद्धा केली. त्याच्या बाकी मित्रांनी इतर जबाबदाऱ्या सांभाळल्या. काल कॉलेज मध्येच झालेल्या स्पर्धेत मयंकच्या या एकांकिकेला प्रथम पारितोषिक, दिग्दर्शक म्हणून मयंकला आणि एकांकिकेला इतरही बरीच पारितोषिकं मिळाली. नटराजाच्या आशीर्वादाने सुरुवात तर उत्तम झालेली आहे. आता पुढचा पूर्ण प्रवास सुद्धा असाच यशस्वी होवो. याच आम्हा दोघांकडून मयंकला शुभेच्छा आणि प्रचंड प्रेम…!!!” असं मंजिरी ओकने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, मंजिरीच्या पोस्टवर अमृता खानविलकर, सुकन्या मोने, जितेंद्र जोशी, राधिका देशपांडे यांनी कमेंट्स करत मयंकचं अभिनंदन केलं आहे.