सध्या हिंदीप्रमाणे मराठीतदेखील बायोपिक चित्रपटांची लाट आली आहे. सुबोध भावेने बालगंधर्व, लोकमान्य टिळक. डॉ. काशीनाथ घाणेकर या व्यक्तींच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये काम केले आहे. मराठीतले एक दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित आता बायोपिक येणार आहे. निळू फुले यांनी २५० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयनाने त्यांनी अनेकांची मन जिंकली आहेत.
प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओक लवकरच दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. तो या चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तो ‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असताना त्याने माध्यमांशी बोलताना हे जाहीर केले. “या चित्रपटाची तयारी सुरु झाली आहे” असे त्याने सांगितले. मात्र यात कोणते कलाकार तंत्रज्ञ असणार आहेत याबाबत त्याने माहिती दिली नाही.
काँग्रेसकाळात ‘गांधी गोडसे’ चित्रपट प्रदर्शित होण्यास अडचणी आल्या असत्या का? दिग्दर्शक म्हणाले…
काही दिवसांपूर्वी निळू फुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रसाद ओकनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. प्रसाद ओकनं त्याच्या पोस्टमध्ये निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले यांनाही टॅग केलं होतं. आपल्या या पोस्टमधून त्यानं निळू फुले यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच त्याने पोस्टमधून बायोपिकची माहिती दिली होती.
प्रसाद ओकने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परिक्षकाच्या भूमिकेत आहे. ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातील प्रसाद ओकची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.