मराठी कलाविश्वातील उत्तम अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रसाद ओकला ओळखलं जातं. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ असे त्याचे अनेक चित्रपट गाजले. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने यश मिळवलं आहे. आता भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांवर बायोपिक बनविण्याची इच्छा अभिनेत्याने नुकत्याच एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.
प्रसादला ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मुलाखतीत तुला कोणाची भूमिका साकारायला आवडेल आणि तू कोणावर बायोपिक बनवशील असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अभिनेता म्हणाला, “मला सदाशिवराव पेशवे यांची भूमिका साकारायला आवडेल. तसेच अण्णा हजारे, वपू काळे, जब्बार पटेल यांच्या भूमिका करायला मला आवडेल.”
हेही वाचा : “थिएटरमध्ये नाटक सुरू अन् माझी पँट घरी…”, विराजस कुलकर्णीचा धमाल किस्सा एकदा ऐकाच; म्हणाला, “शॉर्ट्सवर…”
प्रसाद पुढे म्हणाला, “याशिवाय मला पडद्यावर माननीय शरदचंद्रजी पवार साकारायला आवडतील किंवा मला त्यांचा बायोपिक बनवायला आवडेल. ते महाराष्ट्रातील फार मोठे नेते आहेत. या सगळ्या व्यक्तींच्या भूमिका मला नक्कीच करायला आवडेल किंवा कोणी दिग्दर्शनासाठी विचारणा केली तर मी ते सुद्धा करेन.”
हेही वाचा : ‘ॲनिमल’मधल्या करवा चौथच्या सीनवरुन झालेल्या ट्रोलिंगवर रश्मिकाने सोडलं मौन, म्हणाली, “१० सेकंदाचा डायलॉग..”
दरम्यान, प्रसाद ओकबद्दल सांगायचं झालं, तर आगामी काळात तो ‘वडापाव’, ‘पठ्ठे बापूराव’, ‘धर्मवीर २’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. धर्मवीरचा पहिला भाग प्रचंड गाजला. या सिनेमात आनंद दिघे यांचा जीवनपट उलगडण्यात आला होता. यात प्रसादने साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक देखील करण्यात आलं.