मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून प्रसाद ओकला ओळखलं जातं. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सुरुवातीच्या काळात प्रचंड मेहनत व संघर्ष केल्यावर आज प्रसादच्या वाट्याला हे एवढं मोठं यश आलं आहे. या सगळ्या काळात अभिनेत्याला त्याच्या पत्नीची खंबीर साथ लाभली. मंजिरी आयुष्यातील कठीण काळात आपल्या नवऱ्याच्या पाठीशी ठामपणे उभी होती. एकेकाळी ती सुद्धा संपूर्ण घर सांभाळून नोकरी करायची. नुकत्याच ‘आसोवा’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मंजिरीने वैयक्तिक आयुष्यातील एक प्रसंग सांगितला आहे.
मंजिरी ओक सांगते, “गृहिणी (हाऊसवाइफ) असणं हा देखील खूप मोठा टास्क आहे. मी २३ वर्षे पूर्णपणे गृहिणी म्हणून घराची जबाबदारी सांभाळली आहे. मी दोन वर्षे नोकरी देखील केलेली आहे. तेव्हा माझ्या मोठ्या मुलाचा जन्म होणार होता आणि मी ९ महिन्यांची गरोदर होते. नेहमीप्रमाणे मी माझ्या जॉबवरून निघाले आणि नंतर मला विरार फास्ट ट्रेनमधून एकदम ढकलून दिलं. त्यावेळी ९ महिने पूर्ण झाले होते आणि कधीही बाळंतपण झालं असतं. अचानक असं ढकलल्यामुळे मी प्लॅटफॉर्मवर पडले… सुदैवाने मी पोटावर पडले नाही. पण, त्या प्रसंगानंतर मी खूप घाबरले.”
हेही वाचा : मिस्टर अँड मिसेस ननावरे! लग्नानंतर अजिंक्यची पत्नी शिवानी सुर्वेसाठी रोमँटिक पोस्ट
मंजिरी या धक्कादायक प्रसंगाबाबत पुढे म्हणाली, “आयुष्यात अशी घटना माझ्याबरोबर पहिल्यांदाच घडली होती. तेव्हा माझी मार्केटिंगची नोकरी असल्याने दिवसभर मी खूप फिरायचे. दोन वर्षे सतत फिरत असल्याने मला ट्रेनने प्रवास करण्याची कधीच समस्या नव्हती. पण, अचानक हा प्रसंग घडल्यामुळे माझ्या मनात खूप भीती निर्माण झाली.”
हेही वाचा : “ती माझ्यावर ओरडते”, घटस्फोटानंतर किरण रावसह काम करण्याबाबत आमिर खान म्हणाला, “आम्ही एकत्र…”
“प्रसाद त्यादिवशी घरी येऊन म्हणाला, आता बस्सं झालं! इथून पुढे तू घरी राहा. तोपर्यंत त्याचं कामही उत्तम सुरु झालं होतं. तेव्हा चॅनेल्स आले नव्हते पण, दूरदर्शनवर ‘बंदिनी’, ‘दामिनी’ अशा मालिका सुरू झाल्या होत्या. त्यामुळे एक विशिष्ट रक्कम आमच्या घरात येत होती. त्याला आमच्या दोघांचं भागेल आणि घरभाडं दिलं जाईल एवढे पैसे तरी मिळायचे. त्यामुळे मी नोकरी सोडली आणि घरी राहिले.” असं मंजिरीने सांगितलं.