मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट कायम चर्चेचा विषय असतात. सध्या मंजिरी ‘सुशीला सुजीत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा तिने पती प्रसादसह सांभाळली आहे. अलीकडेच मंजिरीने तिच्या संघर्षाबद्दल सांगितलं.
महिला दिना निमित्ताने मंजिरी ओकने ‘राजश्री मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. यावेळी तिला तिच्या संघर्षाबद्दल विचारलं. तेव्हा मंजिरी ओक म्हणाली, “माझा संघर्ष रुपापासून, रंगापासून आहे. मला लहानपणापासून लोक काळी म्हणून चिडवतायत. चिडवणं चिडवणं असतं. पण, अरे यार वाईट नको वाटू घेऊ गंमत केली, ही एक झालर असते ना ती नाही. हां मी तुला चिडवलं. काळी, बुटकी असण्यावरून चिवडलं. आता ट्रोलिंग होतं ना, त्यामध्ये कित्येकदा अशा कमेंट येतात की, आता तुम्ही म्हाताऱ्या दिसत आहात. अरे माझं वय झालंय. मी ४७ वर्षांची आहे. आता जर म्हातारी दिसली नाही तर मग कधी दिसणार.”
पुढे मंजिरी ओक म्हणाली की, आपल्याकडे मुलींना, बायकांना जितकं डिमोटिव्हेट करता येतं, ते करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. फार कमी वेळा असं केलं जात की, बायकांना मोटिव्हिटेड केलं जात. लहान मुलींपासून सगळ्यांना डिमोटिव्हेटेड हे केलं जातं. तू हे करू नकोस, हे पहिलं वाक्य आहे. तू तिथे जाऊ नकोस, हा तुझा काय मित्र?, ती मैत्रीण काय? यामागे मुलींना जपण्यामागची भावना समजू शकते. कारण त्यांची काळजी असते. मला मुलगी असती तर कदाचित मीही हेच केलं असतं. पण काळाप्रमाणे बदललं पाहिजे. शब्द बदलले पाहिजेत. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. मुलींची मतं ही तुम्ही घेतली पाहिजे, पालक म्हणून चर्चा करा. हा संघर्ष मी खूप फेस केलाय. ८० आणि ९०मध्ये आपले आई-वडील आपल्याला हे नव्हते विचारत की, तुला काही प्रोब्लेम आहे का? त्यांनाच त्यांच्या बिचाऱ्याचे एवढे प्रोब्लेम होते की, नोकरी करा. पगार आणा आणि घर चालवा. आमच्या दोघींची फी भरा.”
दरम्यान, प्रसाद ओक, मंजिरी ओक, स्वप्नील जोशी, निर्मिती ‘सुशीला सुजीत’ चित्रपट १८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं असून यामध्ये स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील आयटम साँग प्रदर्शित झालं, ज्याची सध्या खूप चर्चा सुरू आहे. ‘चिऊताई चिऊताई दार उघडं’ असं गाण्याचं नाव आहे. यामध्ये अमृता खानविलकर आणि गश्मीर महाजनीने जबरदस्त डान्स केला आहे.