मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते म्हणून प्रशांत दामलेंना ओळखले जाते. प्रशांत दामले नाटक, मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आले आहेत. गेली ४० वर्ष ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. रंगभूमीवरील बहुरुपी अभिनेता म्हणून त्यांना ओळखले जाते. अभिनयाबरोबरच प्रशांत दामले आपल्या विनोदी स्वभावामुळेही अनेकदा चर्चेत असतात. २०१३ साली प्रशांत दामलेंना हृदयविकाराचा झटका आला होता. एका मुलाखतीत त्यांनी या घटनेबाबत भाष्य केले आहे.
अलीकडेच प्रशांत दामलेंनी ‘सोलसम विथ सारिका’ नावाच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. मे २०१३ मध्ये प्रशांत दामलेंना हृदयविकाराचा झटका आला होता. या घटनेनंतर त्यांच्या मुलीने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना ते आपल्या मुलीला “पाच मिनिटांत आलो गं” असं म्हणाले होते. या प्रसंगावरून त्यांना “गंभीर परिस्थितीतही तुम्ही इतके शांत कसे राहिलात?” असा प्रश्न विचारण्यात आला.
या प्रश्नाचे उत्तर देत प्रशांत दामले म्हणाले, “डॉक्टरांवरचा विश्वास. प्रेक्षक जसे एखाद्या कलाकाराच्या नाटकाला विश्वासाने जातात, तसे आम्ही कलाकार किंवा अगदी सामान्य प्रेक्षकही डॉक्टरांकडे विश्वासाने जातो. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर डॉक्टर मला स्क्रिनवर सगळं दाखवत होते. त्यांनी मला पाच-सहा सेकंद जास्त दुखेल असं सांगितलं. यानंतर त्यांनी पुन्हा चार-पाच सेकंद तुझं हृदय बंद करतोय असं सांगितलं. सगळं झाल्यानंतर अर्ध्या तासाने मी त्यांना माझ्या हृदयातलं दुसरं ब्लॉकेज काढून टाका हातासरशी असं म्हणालो. त्यावर ते म्हणाले, “जास्त हुशारी करू नकोस, तू आता माझ्या ताब्यात आहेस, आपण परवा बघू.”
पुढे ते म्हणाले, “हा सर्वस्वी विश्वासाचा भाग आहे. तुम्ही तुमचे शरीर विश्वासाने डॉक्टरांच्या हातात दिल्यानंतर तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी डॉक्टरांची आहे आणि मला माहिती होतं की, मी काय इतक्या लवकर जाणार नाही.” दरम्यान, आता हृदयविकाराचा झटक्यातून प्रशांत दामले सावरले आहेत. आता त्यांची प्रकृती उत्तम असून सध्या ते वेगवेगळ्या नाटकांचे यशस्वी दौरे करत आहेत. त्यांच्या या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादही मिळत आहे.