Prathamesh Parab : ‘टाईमपास’, ‘डिलीव्हरी बॉय’, ‘टकाटक’ यांसारख्या चित्रपटांमधून अभिनेता प्रथमेश परब घराघरांत पोहोचला. ‘दृश्यम’सारख्या हिंदी चित्रपटात सुद्धा त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. हा लोकप्रिय अभिनेता यावर्षी फेब्रुवारी महिन्यात विवाहबंधनात अडकला. त्यामुळे प्रथमेश-क्षितीजाची ही लग्नानंतरची पहिलीच दिवाळी आहे.
दिवाळीच्या सणानिमित्त प्रथमेश-क्षितीजाने एक अत्यंत खास आणि कौतुकास्पद गोष्ट केली आहे. या जोडप्याने आपली लग्नानंतरची पहिली दिवाळी दिव्यांग मुलांबरोबर साजरी करण्याचा निर्णय घेतला. याचे काही खास फोटो प्रथमेशच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर करत सुंदर अशी पोस्ट लिहिली आहे. त्यामुळे या जोडप्यावर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
प्रथमेश परबची पत्नी क्षितीजा घोसाळकरची पोस्ट
आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट ही कायम Special असते. त्यातून लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हटलं तर ती अजून Special व्हायला हवी. म्हणूनच आम्ही हा दिवस Special करण्याचा प्रयत्न केला. Sec Day school, खार दांडा येथील मुलांबरोबर… त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हसू, चेहऱ्यावरची प्रचंड सकारात्मकता, आपल्याकडे काहीतरी कमी आहे यापेक्षा आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि त्याचा सहजपणे केलेला स्वीकार त्यांच्या वागण्यातून दिसतो.
आपल्याकडे सगळं असून आपण लहानसहान गोष्टींची किती सहज तक्रार करतो ना!! पण, या मुलांकडे बघून जाणवतं, की तक्रार करण्यापेक्षाही, आयुष्यात कृतज्ञ राहण्यासाठी बरीच कारणं आहेत, फक्त ती शोधता आली पाहिजेत.
जेव्हा आम्ही या मुलांना भेटलो, तेव्हा काही जण म्हणाले, अरे Peter भैया, काही म्हणाले, दगडू दादा, पण त्या व्यतिरिक्त कित्येक मुलांनी सिनेमा कधी बघितलाच नव्हता. त्यांच्यासाठी आम्ही होतो, आपल्याबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी आलेले एक ताई-दादा आणि खरंतर तेच पुरेसं होतं. या मुलांसाठी, शाळेने, एक Special दिवाळी बाजार आयोजित केला होता. मुलांनी ,पणत्यांवर सुरेख Painting केलं, छान छान ग्रीटिंग कार्ड्स बनवले, रांगोळीचे रंग पॅक केलं, त्यांची विक्री केली.
बरं जितकं कौतुक या मुलांचं आहे, तितकंच त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं देखील आहे. सोनाली ताई तुमचं खूप खूप कौतुक आणि मनापासून आभार.
दिवाळीच्या झगमगाटात, दिव्यांच्या लखलखटात, फटाक्यांच्या आतषबाजीत सुद्धा आज फार शांतता आणि प्रसन्नता जाणवतेय. तक्रारीच्या विचारांचं वादळ Pause झालंय आणि आयुष्याच्या रांगोळीत चैतन्याचे रंग भरल्यासारखे वाटतं आहेत…शुभ दीपावली!
हेही वाचा : ‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”
दरम्यान, नेटकऱ्यांनी प्रथमेश व क्षितीजावर भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे. “या जोडीला सलाम आहे”, “किती सुंदर विचार आणि कल्पना आहे”, “कमाल आहे हे सगळं” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी या जोडीचं कौतुक केलं आहे.