Nivedita & Ashok Saraf : अशोक सराफ व वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अशी ही जमवा जमवी’ हा सिनेमा १० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. दोन दिवसांआधीच या सिनेमाचा प्रीमियर सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
सायली संजीव, रुपाली भोसले, बेला शेंडे, सुबोध भावे, लोकेश गुप्ते व कुटुंबीय, सिद्धार्थ चांदेकर, हेमंत ढोमे असे मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार या प्रीमियर शोला उपस्थित होते. ‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका दगडू आपल्या पत्नीसह या सोहळ्याला आला होता.
प्रथमेश परब आणि त्याची पत्नी क्षितीजा घोसाळकर या दोघांनी यावेळी अशोक व निवेदिता सराफ यांची भेट घेतली. निवेदिता यांनी अशोक सराफ यांना क्षितीजाची ओळख करून दिली. त्या दोघांची चेष्टा करत म्हणाल्या, “ही प्रथमेशची बायको… बालविवाह दिसतोय की नाही?” यानंतर प्रथमेश आणि क्षितीजा दोघंही मनापासून हसले.
पुढे, अशोक सराफ मिश्किलपणे म्हणाले, “म्हणूनच मी त्यांना विचारलं कुठल्या शाळेत आहात?” यावर निवेदिता सराफ म्हणाल्या, “२१ आणि १८ वर्षे झाली नसतील तर लग्न करता येत नाही” यानंतर हे चौघंही एकमेकांशी संवाद साधताना मनसोक्त हसताना दिसले.
प्रथमेश आणि क्षितीजा यांनी २४ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्नगाठ बांधली. यंदा फेब्रुवारी महिन्यात त्यांनी दणक्यात लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. प्रथमेश-क्षितीजा लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी थायलंडला गेले होते.
प्रथमेशची पत्नी क्षितीजाने हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने या व्हिडीओला, “आमच्या गोड निवेदिता ताई आणि अशोक मामा” असं कॅप्शन दिलं आहे.
दरम्यान, अशोक सराफ व वंदना गुप्ते यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘अशी ही जमवा जमवी’ हा चित्रपट १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात चैत्राली गुप्ते, सुनील बर्वे, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर आणि नवोदित कलाकार तनिष्का विशे व ओमकार कुलकर्णी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.