प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्राजक्ता माळी, वनिता खरात, प्रथमेश शिवलकर, रोहित माने अशी तगडी कलाकार मंडळी या चित्रपटात झळकणार आहे. २८ फेब्रुवारीला ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कलाकार मंडळी ठिकठिकाणी प्रमोशन करताना दिसत आहेत. या चित्रपटातील ‘बुम बुम बोंबला’ गाणं खूप चर्चेत आलं आहे. म्हणूनच सध्या कलाकार मंडळी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
नुकताच प्रार्थना बेहेरेने ‘बुम बुम बोंबला’ गाण्यावरील डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रार्थनासह अभिनेता पूजा सावंत, भूषण प्रधान, शाल्मली तोळ्ये, पूजा सावंतची बहीण रुचिरा सावंत, भाऊ श्रेयस सावंत पाहायला मिळत आहे. या सहा जणांनी ‘बुम बुम बोंबला’ या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. सर्वजण ‘बुम बुम बोंबला’ गाण्याची हूकस्टेप करताना दिसत आहेत. प्रार्थनाने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही मिनिटांतच या व्हिडीओला ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान सामनाच्या स्प्रेशल स्क्रिनिंग निमित्ताने प्रार्थना बेहेरे, पूजा सावंत, भूषण प्रधान एकत्र भेटले होते. याचा व्हिडीओ प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत सहा विकेट्सने विजय मिळवला. तेव्हा प्रार्थना, पूजा, भूषण जल्लोष करताना दिसले. याचा व्हिडीओ पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता.
‘चिकी चिकी बुबुम बुम’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील लावणी प्रदर्शित झाली. ‘कारभारी’ असं लावणीचं नाव असून यामध्ये निखिल बने झळकला आहे. या चित्रपटात अभिनेते निखिल रत्नपारखी, अभिजीत चव्हाण, चेतना भट्ट, नम्रता संभेराव, प्रियदर्शिनी इंदलकर, ओंकार राऊत हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. ‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात नम्रता संभेरावचा कॅमिओ आहे. या कॅमिओबद्दल नम्रता म्हणाली होती, “‘चिकी चिकी बुबूम बुम’ चित्रपटात माझा छोटा कॅमिओ आहे. अवघ्या चार वाक्यांची भूमिका आहे. ही छोटी भूमिका खूप मोठा परिणाम करते. तर आता मी वेगळं काम केलं आहे, जे चार वाक्यात संपणार आहे. पण अत्यंत महत्त्वाचं काम केलंय. प्रसादचे मला मनापासून आभार मानायचे आहेत.”