‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’ आणि ‘धर्मवीर’ फेम अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करणार आहेत. प्रवीण तरडे त्यांच्या बिनधास्त, बेधडक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. दाक्षिणात्य सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस.राजामौली यांच्याबरोबर काम करणे त्यांचे सर्वात मोठे स्वप्न होते. नुकत्याच ‘बोल भिडू’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी साऊथ इंडस्ट्रीमधील शिस्त आणि राजामौली यांच्याबरोबर काम करताना कसा अनुभव आला याविषयी सांगितले आहे.
हेही वाचा : “लोणावळ्याला थांबले म्हणून दुप्पट टोल?”, ऋजुता देशमुखने व्यक्त केला संताप; म्हणाली, “रितसर तक्रार केली पण…”
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रत्येक कलाकार दिलेल्या वेळेत हजर असतो याविषयी सांगताना प्रवीण तरडे म्हणाले, “दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला शिस्तीत वागावे लागते. मी म्हणेन साऊथमधील प्रत्येक व्यक्ती नियमांचे पालन करतो. आपल्या मराठी कलाविश्वातील कलाकार सुद्धा वेळेत येतात, कोणीही उशिराने येत नाहीत. परंतु, साऊथमध्ये सकाळी ७ ची शिप्ट असेल तर लोक ७ वाजता न येता बरोबर साडेसहाला भूमिकेनुसार संपूर्ण तयारी करून बसतात.”
प्रवीण तरडे पुढे म्हणाले, “मला तयारी करण्यासाठी जवळपास अडीच तास लागायचे. त्यामुळे सातच्या शिफ्टसाठी मला सहायक दिग्दर्शक पहाटे साडेतीनला उठवायला यायचे. माझा मेकअप सव्वाचारला सुरु व्हायचा… अडीच तास तयारी केल्यानंतर मी बरोबर साडेसहाला सेटवर हजर व्हायचो. सात वाजता ओके टेकचा आवाज यायचा. एवढी शिस्त मी आजपर्यंत कुठेही पाहिली नव्हती.”
हेही वाचा : “त्याला अभिनय क्षेत्रातील मुलीशी लग्न…”, स्पृहा जोशीने सांगितला नवऱ्याबद्दलचा किस्सा; म्हणाली…
“दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत जशी काम सुरु होण्याची अचूक वेळ असते तशी काम संपण्याची सुद्धा वेळ असते. शूटिंग वेळेत सुरु झाल्यावर वेळेतच संपायचे. काहीवेळा शूटिंग वेळेआधी संपले तर सरसकट पॅकअप बोलले जाते. ही साऊथची शिस्त आहे आणि आज आपले मराठीतील बरेच कलाकार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सेट झाले आहेत. त्यांनी स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.” असे प्रवीण तरडे यांनी सांगितले. लवकरच एस.एस.राजामौली दिग्दर्शित चित्रपटातून अभिनेते प्रवीण तरडे खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचे नाव त्यांनी उघड केलेले नाही.