Pravin Tarde : ‘मुळशी पॅटर्न’, ‘देऊळबंद’ यांसारखे वैविध्यपूर्ण सिनेमे बनवणारे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सोमवारी ( ११ नोव्हेंबर ) त्यांचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने संपूर्ण मराठी कलाविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
प्रवीण तरडे ( Pravin Tarde ) यांनी दिग्दर्शित केलेला ‘धर्मवीर २’ चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची निर्मिती मंगेश देसाई यांनी केली आहे. ‘धर्मवीर’ व ‘धर्मवीर भाग २’ या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडेंनी सांभाळली होती. यामुळेच निर्मात्याने पोस्ट शेअर करत तरडेंचं कौतुक करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
मंगेश देसाईंची प्रवीण तरडेंसाठी खास पोस्ट
मंगेश देसाई लिहितात, “आज तुझा ( Pravin Tarde ) पन्नासावा जन्मदिवस. मी तुला गेल्या ४ वर्षांपासून ओळखू लागलो आणि तुझ्या आयुष्यातली ४६ वर्षे तू काय तपश्चर्या केली असशील याची जाणीव मला झाली. कामाप्रती असलेला तुझा प्रामाणिकपणा तुझ्या लेखणीतून जाणवणारा सरस्वतीचा तुझ्या पाठीशी असलेला आशीर्वाद… मित्रांसाठी काहीपण असं जाणवणारं प्रेम आणि विशेष माझ्याबाबतीत दिसलेलं प्रेम आणि सहकार्य. जे मी ‘धर्मवीर २’ च्या वेळी बघितलं ते शब्दांत व्यक्त करू शकत नाही. ‘धर्मवीर २’ केवळ तुझ्या संयमामुळे पूर्ण झाला यात शंकाच नाही. साहिल मोशन आर्ट्सचा तू अविभाज्य घटक आहेस हे कधीच विसरू नकोस. तुझी या पुढची वाटचाल या आधीपेक्षा उच्च शिखरावर असेल हे आम्हाला माहिती आहे कारण, तुझा कामाप्रती असलेला प्रामाणिकपणा. तुझं आरोग्य, विचार, संपत्ती, कुटुंब सगळंच उत्तम आणि अबाधित राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना! जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…”
दरम्यान, प्रवीण तरडेंच्या ( Pravin Tarde ) वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर संपूर्ण मनोरंजन विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. अनेक कलाकारांनी त्यांच्यासाठी खास पोस्ट शेअर केल्या होत्या. याशिवाय ‘धर्मवीर २’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर पहिल्या भागाप्रमाणे दुसऱ्या भागातही अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. तर, या सिनेमात अभिनेता क्षितीश दाते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत झळकला आहे.