‘देऊळ बंद’, ‘मुळशी पॅटर्न’, ‘धर्मवीर’सारखे चित्रपट देणारे निर्माते दिग्दर्शक प्रवीण तरडे हे त्यांच्या बिनधास्त, बेधडक स्वभावामुळे कायम चर्चेत असतात. प्रवीण तरडे यांनी ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून शेतकऱ्यांच्या समस्येवर प्रकाश टाकला. हा चित्रपट प्रेक्षकांनी प्रचंड डोक्यावर घेतला, या चित्रपटाला त्यांनी भरभरून प्रेम दिलं. पण हाच मुळशी पॅटर्न सगळ्या बड्या मराठी चॅनल्स, निर्माते आणि वितरकांनी विकत घेण्यास नकार दिला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतंच प्रवीण तरडे यांनी याबद्दल खुलासा केला आहे. पिंपरी चिंचवड येथे ‘दिशा सोशल फाउंडेशन’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रवीण तरडे यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न बऱ्याच मराठी लोकांनी नाकारल्याचा खुलासा केला. इतकंच नव्हे तर बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीने तो चित्रपट विकत घेऊन तो चालवण्यात प्रवीण तरडे यांची मदत केली होती.

आणखी वाचा : चित्रविचित्र फॅशनसाठी उर्फी जावेदने मागितली जाहीर माफी; चाहते म्हणाले “एप्रिल फूल…”

याबद्दल बोलताना प्रवीण तरडे म्हणाले, “आम्ही मुळशी पॅटर्न घेऊन एका मोठ्या चॅनलकडे गेलो जे चित्रपट घेतात. त्यांना आम्ही मुळशी पॅटर्न दाखवला, पण त्यांना काही केल्या तो चित्रपट रुचला नाही. ती शहरी माणसं होती, त्यांनी मुळात कधी गाव किंवा शेतकऱ्याचं आयुष्य बघितलंच नसावं त्यामुळे आणि चित्रपटातील भाषा ही थोडी रांगडी असल्याचं कारण देऊन त्यांनी हा चित्रपट घेण्यास नकार दिला. यामुळे माझे निर्माते चिंतेत पडले, कारण त्यांनी त्यांच्या वडिलांशी भांडून माझ्या या चित्रपटावर पैसे लावले होते.”

यानंतर प्रवीण तरडे बॉलिवूडच्या एका बड्या माणसाविषयी खुलासा करत म्हणाले, “नंतर आमच्या टीममधील लोकांनी ठरवलं की हा चित्रपट आता त्यांना दाखवायचा ज्यांना ही भाषा समजते. त्यामुळे आम्ही आजवर ज्यांनी ‘बाहुबली’, ‘दंगल’, ‘३ इडियट्स’सारखे चित्रपट चालवले असे बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे पती अनिल थडानी यांच्याकडे हा ‘मुळशी पॅटर्न’ घेऊन गेलो. ते आम्हाला म्हणाले की मी सर्वप्रथम चित्रपट बघतो आणि मग तुमच्याशी बोलतो. त्यावेळी त्यांनी तो चित्रपट मराठीतच सबटायटल्स नसताना पाहिला.”

आणखी वाचा : ‘हेरा फेरी’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी सुरुवातीला फिरवलेली पाठ पण… जाणून घ्या नेमकं काय घडलं?

पुढे प्रवीण तरडे म्हणाले, “चित्रपटाचा मध्यांतर झाला जिथे सिनेमातील राहुल्या नन्या भाईच्या डोकात कोयता घालतो. त्यानंतर आम्ही अनिल थडानी यांना विचारलं की आपण थोड्याच वेळात पुढचा चित्रपट सुरू करुयात का? त्यावर ते म्हणाले, मला पुढे हा चित्रपट पाहायची गरज नाही, कारण मी हा चित्रपट विकत घेतला आहे. हा चित्रपट बंपर हीट ठरणार हे अनिल थडानी आम्हाला म्हणाले. यावर आम्ही त्यांना सांगितलं की मराठीतले निर्माते तर हा चित्रपट चालणार नाही असं म्हणतात, त्यावर ते म्हणाले की मग त्यांना चित्रपट काय असतो ते समजत नसेल! यानंतर त्यांनी तो चित्रपट चालवला, मुळशी पॅटर्न प्रदर्शित झाला आणि नंतर सलग २ दिवस तिकीट मिळत नव्हती. तब्बल ११ आठवडे ‘मुळशी पॅटर्न’ मराठी लोकांनी डोक्यावर घेतला. यानंतर त्याच बड्याबड्या मराठी चॅनल्स आणि निर्माते, वितरक यांचे आम्हाला सतत फोन्स येत होते, पण आम्ही त्यांच्या फोनला उत्तरच दिलं नाही, कारण आम्हाला दिलेला त्रास इतक्या सहज आम्ही विसरणारे नव्हतो.”

आणखी वाचा : “आम्ही कोणतीही तडजोड…” अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’च्या पुढील भागांबद्दल मोठा खुलासा

नुकताच प्रवीण तरडे यांना त्यांच्या ‘धर्मवीर’ चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सोशल मीडिया पोस्टमधून त्यांनी ही माहिती दिली. आता प्रवीण तरडे ‘मुळशी पॅटर्न २’ आणि ‘धर्मवीर २’ हे दोन्ही चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहेत. त्यांच्या या दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin tarde says big marathi channels and distributors refused to take mulshi pattern avn