अभिनेते उपेंद्र लिमये आणि अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची मैत्री जगजाहीर आहे. प्रवीण तरडे यांच्या बऱ्याच चित्रपटात उपेंद्र लिमये यांनी काम केलं आहे. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही क्षेत्रात या जोडगोळीनं आपलं वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. नुकतीच्या एका युट्यूब चॅनलला उपेंद्र लिमये व प्रवीण तरडे यांनी मुलाखत दिली. यावेळी दोघांनी अभिनय क्षेत्रातील सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला. या काळात उपेंद्र लिमये प्रवीण तरडेंना तुला स्टेजवर येऊन मारीन, असं म्हणाले होते. यामागचा नेमका किस्सा काय होता? वाचा…
हेही वाचा – ‘हा’ अभिनेता साकारणार होता आनंद दिघेंची भूमिका, पण…; दिग्दर्शक प्रवीण तरडेंचा खुलासा
‘बोल भिडू’ या यूट्युब चॅनेलवरील ‘दिलखुलास गप्पा’ कार्यक्रमात उपेंद्र लिमये व प्रवीण तरडे सहभागी झाले होते. यावेळी एकांकिका करणाऱ्यांविषयी बोलत असताना प्रवीण तरडे यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले की, “माझी शेवटची एकांकिका होती. या एकांकिकेनं बीडमध्ये करंड जिंकला होता. हा (उपेंद्र लिमये) तिथं प्रमुख पाहुणा होता. मला बघू याचं डोकंच फिरलं. तू अजून एकांकिका करतोयस? असं हा म्हणाला.”
हेही वाचा – “‘मुळशी पॅटर्न’ पाहिल्यावर कॉलर तोंडात पकडून कौतुक करणाऱ्या सलमानने…”, उपेंद्र लिमये यांचं विधान
“मी पुढे म्हणालो, अरे मला ते करुनच आनंद मिळतो ना. यावर हा (उपेंद्र लिमये) म्हणाला की, तुझी कुवत कळते का काय आहे? तू चित्रपट, व्यावसायिक नाटकं केली पाहिजे. त्यानंतर मी म्हणालो, अरे पण मला एकांकिका करुनच आनंद मिळतो. तेव्हा उप्यानं मला पकडला आणि सांगितलं. त्यावेळेस अरविंद जगताप सुद्धा होता. तर उप्या म्हंटला, जर तू मला आता कुठल्या स्पर्धेमध्ये दिसलास ना, तर पव्या तुला स्टेजवर असताना येऊन मारीन. त्यामुळे आता थांबव हे एकांकिका वगैरे आणि समुद्रात उडी मार,” असा हा किस्सा प्रवीण तरडेंनी सांगितला.
हेही वाचा – “… तर ‘मुळशी पॅटर्न’ १०० कोटी क्रॉस केलेला चित्रपट असता”; दिग्दर्शक प्रवीण तरडे खंत व्यक्त करीत म्हणाले…
दरम्यान, उपेंद्र लिमये व प्रवीण तरडे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांचा २८ जुलैला ‘आणीबाणी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. दिनेश जगताप यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. तसेच या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ही धुरा अरविंद जगताप यांनी सांभाळली आहे.