Pravin Tarde Post On Pahalgam Attack : जम्मू-काश्मीरचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात ही घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, पर्यटकांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन विदेशी, दोन स्थानिक तर २२ भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. याशिवाय जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला आहे. याप्रकरणी भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर कलाकार मंडळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. काही कलाकारांनी पाकिस्तानचा उल्लेख करत उघडपणे संताप व्यक्त केला आहे.

सध्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची अतिशय हृदयद्रावक दृश्य सर्वत्र व्हायरल होत आहेत. याप्रकरणी अभिनेते प्रवीण तरडे देखील फेसबुक पोस्ट शेअर करत व्यक्त झाले आहेत. त्यांच्या जवळच्या मित्राला या हल्ल्यात जीव गमवावा लागला असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. याशिवाय मित्रासाठी शेवटच्या क्षणी काहीच करता नाही याबाबत प्रवीण तरडेंनी या पोस्टद्वारे हळहळ व्यक्त केली आहे.

प्रवीण तरडे म्हणाले, “आतंकवाद आज घरात आला… माझा जवळचा मित्र संतोष जगदाळे या हल्ल्यात गेला. मित्रा संतोष माफ कर आम्हाला… आम्ही काही करू शकत नाही.” त्यांच्या या पोस्टवर असंख्य प्रतिक्रिया आल्या आहेत.

याशिवाय प्रवीण तरडेंच्या पत्नी स्नेहल तरडेंनी देखील पोस्ट शेअर करत याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणतात, “त्यांनी उघडपणे गोळ्या झाडल्या आणि त्यांच्याबद्दल उघडपणे वाईट बोलायला विचार करावा लागतोय ही केवढी खेदाची बाब आहे. मला उघडपणे घाण बोलायचं आहे, खूप शिव्या देऊनही मन शांत होणार नाही.”

Pravin Tarde Post On Pahalgam Attack
प्रवीण तरडेंची पोस्ट ( Pravin Tarde Post On Pahalgam Attack )

दरम्यान, पुण्यातील व्यावसायिक संतोष जगदाळे यांच्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याची माहिती त्यांची २६ वर्षीय मुलगी आसावरी जगदाळे हिने पीटीआयला दिली आहे. हे प्रवीण तरडेंचे जवळचे मित्र होते.