मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते प्रवीण तरडे ‘बलोच’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची कथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
‘बलोच’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यादरम्यान प्रवीण तरडेंनी लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शुटिंगचे काही किस्सेही शेअर केले. “बलोचसाठी चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक प्रकाश पवार यांनी मला पाच वर्षांपूर्वीच विचारलं होतं. लॉकडाऊनच्या आधीच या सिनेमाचं अर्ध शूटिंग झालं होतं. पण नंतर लॉकडाऊन लागलं. त्यानंतर मग पाकिस्तान बॉर्डरवर असलेल्या जैसलमेर वाळवंटात आम्ही राहिलेलं शूटिंग पूर्ण केलं,” असं प्रवीण तरडे म्हणाले.
“वाळवंटात शूटिंग करण्याचा अनुभव पण छान होता. दिवसा ५० डिग्री सेल्सिअस तापमान आणि संध्याकाळी सात-आठ वाजल्यानंतर तामपान एकदम ९-१० डिग्री सेल्सिअस असायचं. आम्ही सगळे जण उन्हात शूटिंग करायचो. रखरखत्या उन्हात मराठे कसे लढले असतील, याचा अंदाज आम्हाला शूटिंग करताना आला, ” असंही प्रवीण तरडेंनी सांगितलं.
हेही वाचा>> शिव ठाकरे प्रसिद्ध अभिनेत्रीला करतोय डेट? डेटिंगच्या चर्चांवर खुलासा करत म्हणाली, “तो खूप…”
पुढे ते म्हणाले, “पानिपत हा मराठ्यांचा पराभव नाही, हे आम्हाला या चित्रपटातून दाखवायचं आहे. पानिपत ही एक विजयगाथा आहे. पानिपतच्या लढाईत जेवढे मराठे मरण पावले त्याच्या दुपट्टीने शत्रूच्या सैन्याला आपण कंठस्नान घातलं. पानिपतच्या लढाईत मराठ्यांचा इतिहास खऱ्या अर्थाने गाजला. म्हणूनच त्यानंतर भारतात कोणीही यायचा प्रयत्न केला नाही. पानिपतच्या लढाईतील जखमी मराठ्यांनी वाळवंटात गेल्यानंतरही कसा लढा दिला, याची ही गोष्ट आहे.”
हेही वाचा>> ‘आदिपुरुष’मध्ये रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान चित्रपटाचं प्रमोशन करणार नाही, कारण…
पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रवीण तरडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. येत्या ५ मे रोजी ‘बलोच’ चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.