अभिनेते प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बलोच’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन यात घडणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील एक रोमँटिक गाणे प्रदर्शित झाले. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या गाण्यावर प्रवीण तरडेंनी त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया काय होती, याबद्दल भाष्य केले आहे.
‘बलोच’ या चित्रपटाच्या पोस्टर, टीझरमध्ये प्रवीण तरडे एका लढवय्याच्या रूपात पाहायला मिळत आहेत. मात्र यात त्यांचे एक रोमँटिक रुपही पाहायला मिळत आहे. प्रवीण तरडेंच्या ‘खुळ्या जीवाला आस खुळी’ या गाण्यात एक अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे. याबद्दल प्रवीण तरडेंनी ‘राजश्री मराठी’शी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
आणखी वाचा : Video : बहुचर्चित ‘बलोच’मध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार प्रवीण तरडेंच्या पत्नीची भूमिका, गाण्यात दिसली झलक
‘खुळ्या जीवाला आस खुळी’ या गाण्यात तुमचा अंदाज फारच मस्त आहे. तुम्ही याबद्दल काय सांगाल? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मला यात रोमँटिक भूमिका का करायला दिली आहे, हाच प्रश्न पडलाय. रोमँटिकपणा हे माझ्यात कुठेच नाही.”
“माझं हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर बायकोला खूप मोठा धक्का बसला आहे. तिने ते गाणं पूर्ण पाहिलंच नाही. ती मला म्हणाली, “मी ते गाणं पाहणार नाही.” त्यावर मी तिला म्हटलं की, “अगं तो चित्रपट आहे. तू पण अभिनेत्री आहे. त्यामुळे तुला ते सर्व माहिती आहे.” त्यावर तिने म्हटले की, “हंबीरराव चित्रपटात मी तुझी नायिका होते. तेव्हा तू असं रोमँटिक गाणं का केलं नाही?” त्यावेळी मी तिला समजवलं. पण तिचा राग तसाच आहे. ते गाणं फार सुंदर झालं आहे. पण माझी बायको सोडून ते संपूर्ण जगाने पाहिलंय.”
आणखी वाचा : “पानिपत ही मराठ्यांची शेवटची लढाई नव्हती…” प्रवीण तरडेंच्या बहुचर्चित ‘बलोच’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
“त्यात रोमँटिक प्रवीण तरडे दिसलाय, हे पाहून मला आश्चर्य वाटलंय. इतर वेळी माझा कॉन्फिडन्स असतो तो दिसतो. पण तिकडे मी घाबरत घाबरत स्मिताच्या गालावरुन हात फिरवला आहे. ते रोमँटिक गाणं करताना माझ्या नाकी नऊ आले होते. पण ते आता कसं बसं झालंय”, असे प्रवीण तरडे म्हणाले.
दरम्यान ‘बलोच’ या चित्रपटात प्रवीण तरडे यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री स्मिता गोंदकर साकारत आहे. प्रवीण तरडे आणि स्मिता गोंदकर यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्याला श्रेया घोषाल हिने स्वरबद्ध केले आहे. मराठ्यांच्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा लढा दाखवणाऱ्या ‘बलोच’ चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे.