मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रवीण त्यांच्या यशाचं श्रेय बऱ्याचदा पत्नी स्नेहलला देताना दिसतात. आता स्नेहलनेच प्रवीण यांच्याविषयी भाष्य केलं आहे.
प्रवीण त्यांच्या पत्नीबरोबर अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करताना दिसतात. आता स्नेहलने ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रवीण यांचं कौतुक केलं आहे.
स्नेहलला प्रवीण यांच्यामधील कोणते गुण आवडतात असं विचारण्यात आलं. यावेळी ती म्हणाली, “अनेक मुलाखतींमध्ये मी सांगितलं आहे की, प्रवीणसाठी मी एक ओळ लिहिली आहे. ती ओळ म्हणजे, निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा, आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा तू. या तिन्ही उपमा त्याच्यासाठी अगदी योग्य आहेत.”
आणखी वाचा – ‘सहकुटुंब सहपरिवार’च्या मुख्य कलाकाराची मालिकेमधून एक्झिट, अभिनेत्री नंदिता पाटकर म्हणते, “आगाऊ माणूस…”
“तो कोणाच्या बापालाही घाबरणारा नाही. मित्रांसाठी, समाजासाठी, लोकांसाठी खूप काही करण्याची त्याची वृत्ती आहे. एखाद्याची काळजी किंवा त्याच्यावर प्रेम करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा तो अगदी मनापासून ते करतो. त्याचं काळीज खूप मऊ आहे. असा तो आहे.” स्नेहलच्या बोलण्यामधूनच ती प्रवीण तरडे यांच्यावर किती प्रेम करते हे दिसून येतं.