सध्या ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘तेंडल्या’, ‘बलोच’ हे मराठी चित्रपट चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटांना प्रेक्षक चांगला प्रतिसाद देताना दिसत आहेत. पण याचबरोबर प्रेक्षकांची गर्दी खेचतोय तो ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट. या चित्रपटाचे सर्व शो हाउसफुल होत आहेत. पण या चित्रपटामुळे एका मराठी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याचं आता म्हटलं जात आहे.
आगामी मराठी चित्रपटांच्या यादीतील एक चित्रपट म्हणजे ‘चौक.’ प्रवीण तरडे, उपेंद्र लिमये, संस्कृती बालगुडे, किरण गायकवाड यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट १९ मे रोजी प्रदर्शित होणार होता. गेल्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता, जो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. पण आता प्रदर्शनाला सात-आठ दिवस शिल्लक असताना या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
काल अभिनेता किरण गायकवाड यांनी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत या चित्रपटाची बदललेली तारीख प्रेक्षकांना सांगितली. किरणने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, “मायबाप रसिक प्रेक्षकहो, काही तांत्रिक कारणांमुळे आपला चौक हा चित्रपट २ जून रोजी आपल्या भेटीस घेऊन येत आहोत. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच असू द्या.”
हेही वाचा : Video: जपानी कलाकारालाही आवरला नाही ‘बहारला हा मधुमास’ गाण्यावर नृत्य करण्याचा मोह, व्हिडीओ तुफान व्हायरल
किरणने ही पोस्ट शेअर करताच चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. अनेकांनी, “हा चित्रपट ‘द केरला स्टोरी’मुळे पुढे ढकलण्यात येत आहे का?” असा प्रश्न किरणला विचारला. या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्यामुळे चाहते काहीसे दुःखी झाले आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना आता जून महिन्याची वाट पाहावी लागणार आहे.