लग्नाळू आणि लग्न झालेल्या जोडप्यांतील मतभेद आणि मनभेद हा आपल्याकडे आजच्या नाटकवाल्यांचा ‘वीक पॉइंट’ झाला आहे की काय नकळे! गेल्या काही वर्षांत या विषयावरची दोन डझन नाटकं तरी आली असतील. नव्या, होतकरू लेखकांना नाटकाचे नवे विषय तरी सुचत नसावेत किंवा त्यांच्या चिंतनात हा आणि हाच एकमेव विषय असावा अशी दाट शंका त्यामुळे साहजिकपणेच येते. विजय तेंडुलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी आदी जुन्या लेखकांनी किंवा नव्वदीच्या दशकांत नाटक लिहिणारे प्रशांत दळवी, अभिराम भडकमकर, जयंत पवार, प्रेमानंद गज्वी असोत… यांनी त्यांच्या ऐन तरुण वयात किती वैविध्यपूर्ण विषयांवर नाटकं लिहिली. मग आजच्या पिढीला आपल्या भोवतालच्या भेडसावणाऱ्या विषयांवर नाटकं का लिहावीशी वाटू नयेत? त्यांचं भावविश्व फक्त लग्न या विषयाभोवतीच का घुटमळावं? याचा अर्थ त्यांची सर्जनशीलता कुठंतरी तोकडी पडतेय किंवा तिचा पैस तरी संकुचित आहे. असंच नवरा-बायको संबंधांवरचं सुनील हरिश्चंद्र लिखित- दिग्दर्शित ‘पाहिले न मी तुला’ हे नवं नाटक नुकतंच रंगमंचावर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरं तर सुनील हरिश्चंद्र यांनी याआधी वेगवेगळ्या विषयांना हात घातला आहे. त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या काहीएक वेगळ्या अपेक्षा आहेत. अशावेळी त्यांच्याकडून अशा नाटकाची अपेक्षा नव्हती. अर्थात त्यांनी या नाटकाच्या गाभ्याला स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे. प्रेमविवाहानंतर प्रत्यक्ष संसार करताना नवरा-बायकोत नेमकं काय बिघडत जातं याचा वेध घ्यायचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे. सुवेधा आणि अंशुमन हे जोडपं… त्यांच्यात म्हटलं तर कसलेही तीव्र मतभेद नाहीएत. तरीही छोट्या छोट्या गोष्टींवरून त्यांच्यात खडाजंगी उडते. अंशुमन शक्य तितकं पडतं घ्यायचा प्रयत्न करतो. पण त्यातूनही गैर अर्थ काढून सुवेधा त्याच्याशी भांडण काढते. तिच्याशी कसं आणि काय बोलावं हेच त्याला कळेनासं होतं. एकाच गोष्टीकडे ती वेगळ्या दृष्टिकोनातून बघते आणि त्याच गोष्टीकडे त्याचा पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न असतो. सरळ गोष्टींतही वाकडे अर्थ काढले जातात. त्यातून मग वादावादी, भांडणं ठरलेली. तो ही गोष्ट आपला मानसोपचारतज्ज्ञ हेमंत याच्याकडे बोलतो. पण त्यालाही सुवेधाचा आक्षेप : घरातल्या गोष्टी बाहेरच्यांना का सांगायच्या? शेवटी गोष्टी या टोकाला जातात, की सुवेधा घर सोडून निघून जाते. अंशुमन सैरभैर होतो. तो शेवटी हेमंतचाच आधार घेतो. त्याला सगळं सांगतो. तो स्त्री आणि पुरुष यांच्यातील एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा फरक, त्याची शास्त्रीय कारणमीमांसा वगैरे गोष्टी त्याला समजावून देतो. त्याला त्या कितपत कळल्यात हा प्रश्न अलाहिदा. पण तो त्यानुसार आपल्यात बदल करायला राजी होतो. एव्हाना सुवेधालाही त्यानं समजावलेलं असतं. आता ते कितपत प्रत्यक्षात येणार, हाच प्रश्न उरतो. नाहीतर पहिले पाढे पंचावन्न!

हेही वाचा >>> New Movies Releasing in November : महिन्याभरात चार सिक्वेलपटांची पर्वणी

सुनील हरिश्चंद्र यांनी हसतखेळत, खुपत-टोपत हा विषय मांडला आहे. यातला मानसोपचारतज्ज्ञ अनेक नाटकांतून आलेलाच आहे. त्याला इथे जरा जास्तच ‘वेटेज’ दिलेलं आहे. त्याने नाटकाची गतिमानता अवरुद्ध होते. बाकी नवरा-बायकोतलं ‘तू तू- मी मी’ फर्मास बेतलं आहे. प्रेक्षक त्याच्याशी सहमत होतात. दुसऱ्याला समजून घेतलं नाही तर खरं तर कुठलंच नातं टिकू शकत नाही. मग नवरा-बायको हे ‘कृत्रिम’ नातं त्याला कसा अपवाद असणार? लग्नसंस्थेबद्दलच्या आपल्या जुन्या कल्पना आणि आज त्यात आधुनिकतेमुळे झालेले बदल स्वीकारल्याविना किंवा त्याला ठोस पर्याय शोधल्याविना आता भांड्याला भांडं लागणारच आणि या नात्याला पोचे पडणारच. तेव्हा आता या नात्याला ठोस पर्याय शोधल्याविना नव्या लेखकांनी त्याला हात घालणंच अनुचित. म्हणजे आजूबाजूला दिसणारं वास्तवच रेखाटायचं तर ते सगळ्यांनाच माहीत आहेच. त्यात नवं काय? असो.

लेखक-दिग्दर्शक सुनील हरिश्चंद्र यांनी ते हसत-खेळत मांडलं आहे… त्यातल्या तीव्रतेसह! कलाकारांची निवड हा अशा नाटकाच्या यशस्वीतेत महत्त्वाचा घटक असतो. त्यातही त्यांनी बाजी मारली आहे. फक्त मानसोपचारतज्ज्ञाची लुडबूड जरा कमी असती तर बरं झालं असतं. जे आहे ते थेटच प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं असतं. अंशुमन विचारे यांचा ‘बिच्चारा’ नवरा भाव खाऊन जातो. पण त्याला अधेमधे आगाऊपणा करण्याची मुभा दिग्दर्शकानं दिली आहे. ते त्याचा हशे वसूल करण्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेतात. सुवेधाच्या भूमिकेत सुवेधा देसाई चपखल बसल्या आहेत. कुठली गोष्ट कुठंही नेण्याचं बायकांचं तंत्र त्यांनी इतक्या लीलया दाखवलं आहे की ज्याचं नाव ते! त्यामुळे त्या अत्यंत नैसर्गिक वाटतात. त्याचं वागणं, बोलणं, शब्दोच्चार सगळंच खरंखुरं वाटतं. हेमंत पाटील मानसोपचारतज्ज्ञ म्हणून सहज वावरतात. पण या पात्राला फार कंगोरे नसल्याने ते जेवढ्यास तेवढं असतं तर सुसह्य झालं असतं. संदेश बेंद्रे यांनी सुवेधा-अंशुमनचं घर यथार्थ उभं केलं आहे. निहारिका राजदत्त यांच्या गीतांना निनाद म्हैसाळकर यांनी सुश्राव्य संगीत दिलं आहे. राजेश शिंदे यांनी प्रकाशयोजनेतून मूड्स ठळक केले आहेत. नवरा-बायकोच्या नात्यातले ताणतणाव का निर्माण होतात हे अनुभवायचं असेल तर हे नाटक नक्की पाहा.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Preview of pahile na mi tula marathi natak written by sunil harishchandra zws