प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांच्या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ या व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता प्रिया-उमेशची जोडी पुन्हा एकदा नव्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनच्या माध्यमातून प्रिया बापट आणि उमेश कामत या दोघांनी आपल्या चाहत्यांना नव्या नाटकाविषयी माहिती दिली. दोघेही इरावती कर्णिक लिखित ‘जर तरची गोष्ट’या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर एकत्र येतील. नाटकाविषयी सांगताना प्रिया म्हणाली, “‘नवा गडी नवं राज्य’ या नाटकाला प्रेक्षकांना खूप चांगला प्रतिसाद दिला. यानंतर २०१४ पासून मी नाटकात काम केलेलं नाही. आता नाटकात काम केल्यास जवळच्या व्यक्तींबरोबर करायचे हे मनात ठरवलं होतं. इरावती कर्णिक आमच्या दोघांची फार चांगली मैत्रीण असून तिने हे नाटक लिहलं आहे. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग मुंबई आणि पुण्यात होणार आहेत. आम्ही तालमीला सुरुवात केली असून ५ ऑगस्टला गडकरी रंगायतनला प्रयोग होईल, तर पुढचा प्रयोग पुण्यात १२ ऑगस्टला होईल. तुम्ही सर्वजण नक्की या!”
हेही वाचा : “निसर्गाने लोकांना रेड अलर्ट दिला…”, हिमाचल प्रदेशातील पूरस्थितीवर यामी गौतमने मांडले परखड मत
उमेश कामत इन्स्टाग्रामवर या नाटकाचा प्रोमो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “प्रियाबरोबर मी खूप वर्षांनी रंगभूमीवर एकत्र काम करणार आहे. जर आपण पुन्हा एकदा एकत्र नाटक केलं तर? या ‘जर तर’ पासून सुरू झालेला प्रवास ‘जर तरची गोष्ट’पर्यंत येऊन पोहोचलाय. ‘जर आणि तर’ मध्ये अडकलेल्या नात्याची, हसण्याची आणि रुसण्याची ही आजची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल याची आम्हाला खात्री आहे.”
हेही वाचा : “तिथे एक बेशुद्ध मुलगी दिसली अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे.