प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांच्या २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘नवा गडी नवं राज्य’ या व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता प्रिया-उमेशची जोडी ‘जर तरची गोष्ट’ या नव्या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगांना ५ ऑगस्टपासून सुरूवात झाली. या नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग मुंबई आणि ठाण्यात पार पडले. प्रिया-उमेशची जोडी आणि नाटकाचं कथानक प्रेक्षकांना आवडत असल्याने जवळपास प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होत आहे.
हेही वाचा : Bigg Boss 17 : ‘बिग बॉस’च्या नव्या घराची पहिली झलक आली समोर, ‘असं’ असेल आलिशान घर
प्रयोग सुरू झाल्यापासून ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या टीमने अवघ्या दोन महिन्यांमध्ये प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे. नाटकाची संपूर्ण टीम नुकतीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निघाली आहे. ७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियातील सिडनीत आणि ८ ऑक्टोबरला मेलबर्न येथे नाटकाचे प्रयोग होणार आहेत. नाटकाच्या टीमने नुकताच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निघण्यापूर्वीचा खास सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दरम्यान, या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हे नाटक इरावती कर्णिक यांनी लिहिलं असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केलं आहे.