चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज या चारही माध्यमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून प्रिया बापटला ओळखलं जातं. तिने मराठीसह बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्रीने नुकत्याच ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सोशल मीडिया ट्रोलिंग, मध्यंतरी व्हायरल झालेला बोल्ड सीन आणि ऑस्ट्रेलियात परिधान केलेल्या बिकिनीसंदर्भात आपलं मत मांडलं आहे.
प्रिया बापटला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील बोल्ड सीनबाबत विचारलं असता ती म्हणाली, “त्या बोल्ड सीनपासून ते आता मी ऑस्ट्रेलियात बिकिनी घालून फोटोशूट केलं तिथपर्यंत या काळात मला लोकांचे बरेच अनुभव आले. आमच्या प्रियाने असं नाही करायचं, आमची प्रिया साडीतच छान दिसते अशा अनेक प्रतिक्रिया मला ऐकायला मिळाल्या. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या त्या बोल्ड सीननंतर तर मला लोकांचं प्रचंड ऐकायला लागलं होतं.”
हेही वाचा : ‘अॅनिमल’मध्ये उपेंद्र लिमयेंनी दिला साडेतीन पानांचा वन टेक सीन, दिग्दर्शक थक्क होऊन म्हणाला, “सर अजून…”
प्रिया पुढे म्हणाली, “आपण समाज म्हणून एखाद्या कलाकाराकडे कलाकार म्हणून पाहिलं पाहिजे. लोक मला आपलं समजतात…त्यांच्या घरातल्यासारखं समजतात ही खूप चांगली गोष्ट आहे. मग त्या सगळ्या लोकांना मी असं जरुर सांगेन की, माझ्या घरच्यांना या सगळ्याचा अजिबात त्रास होत नाही…त्यांना काहीच समस्या नाहीये. माझं हे काम आहे ही गोष्ट त्यांनी समजून घेतली आहे. माझे आई-बाबा, माझा नवरा यांना काहीच अडचण नव्हती. त्या सगळ्यांनी माझ्या कामाचा एक भाग म्हणून या सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारल्या आहेत…जबरदस्तीने नाहीत.”
“‘सिटी ऑफ ड्रीम्स’ प्रदर्शित झाल्यावर ती क्लिप सगळीकडे व्हायरल होत होती. मला सुरुवातीला काहीच कल्पना नव्हती कारण, मी प्रमोशनमध्ये व्यग्र होते. मला ज्या क्षणी ती क्लिप दिसली, तेव्हा मी सगळ्यात आधी बाबांना फोन केला त्यांना सगळी कल्पना दिली. तुम्हाला माझी लाज नाही ना वाटत? असंही मी त्यांना विचारलं. त्यावर माझ्या बाबांनी एका शब्दात मला उत्तर दिलेलं, ते म्हणजे हा सगळा तुझ्या कामाचा एक भाग आहे. तू काम म्हणून हे स्वीकारलंस यात आम्हाला काहीच गैर वाटत नाही. तू दुर्लक्ष कर…विसरुन जा!” असं प्रियाने सांगितलं.
हेही वाचा : माधुरी दीक्षितने लोकसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर सोडलं मौन, म्हणाली… “राजकारण हे…”
“ऑस्ट्रेलियातील बिकिनी शूटबद्दल सांगताना प्रिया म्हणाली, ते फोटो माझ्या वडिलांनी पाहिले…त्यांचं काहीच म्हणणं नव्हतं. मला असं वाटतं आपण कलाकारांना आपल्याला हव्या त्या सोयीच्या साचात पाहत असतो आणि असं करणं योग्य नाही. बॉलीवूड-हॉलीवूड सिनेमामधील कलाकारांच्या भूमिकांना तुम्ही पात्र म्हणून बघता आणि हेच काम तुमच्या मराठी मुलीने केलं तर संस्कृती आड का येते? एका मराठी मुलीने साकारलेल्या पात्राचा अभिमान तुम्हाला का वाटत नाही? पण, अशा चर्चा तेवढ्या काळापुरत्याच होतात त्यानंतर होत नाही. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे आपल्या हातात असतं.” असं प्रियाने सांगितलं.