अभिनेत्री प्रिया बापटने मराठीसह हिंदी कलाविश्वात सुद्धा आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज या चारही माध्यमांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. तिने ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये साकारलेल्या पूर्णिमा गायकवाड या भूमिकेचं सुद्धा सर्वत्र कौतुक करण्यात आलं होतं. मात्र, या सीरिजमधला एक बोल्ड सीन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता, यानंतर काही दिवस प्रियाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. या सगळ्या परिस्थितीला अभिनेत्री कशी सामोरी केली याबद्दल तिने डिजिटल कॉमेंट्री या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

प्रिया बापट म्हणाली, “मला ती क्लिप व्हायरल झाल्यावर खूप वाईट वाटलं होतं. मी आणि एजाज एका मुलाखतीत होतो आणि अचानक फोन वाजू लागला. फोनवर लोक बोलत होते, तू हा व्हिडीओ ओपन नको करुस…माझं असं झालं की, हा व्हिडीओ व्हायरल कसा झाला? कारण, त्याआधी रात्री १२ वाजता म्हणजे अगदी काही तास आधी ती सीरिज प्रदर्शित झाली होती आणि सकाळी हे सगळं झालं. ती क्लिप व्हायरल होणं हा प्रमोशनचा भाग नव्हता…मीच खूप जास्त शॉक होते.”

प्रिया पुढे म्हणाली, “माझं असं झालं लोक एपिसोड्स न बघता लोक असे का बोलत आहेत. घरी जाऊन मी प्रचंड अस्वस्थ होते. मी नागेश सरांना फोन केला, अर्थात मला ऑडिशनच्या वेळीच या सीनबद्दल सांगितलं होतं. पडद्यावर मी पहिल्यांदाच असा सीन करणार होते त्यामुळे मी सगळ्या गोष्टी नागेश सरांना विचारल्या होत्या. तो सीन स्क्रिप्टची सुद्धा गरज होती त्यामुळे सीरिज न पाहता लोकांनी ती क्लिप व्हायरल केली हे मला रुचत नव्हतं. मी रडले आणि सगळ्यात आधी माझ्या पालकांना फोन केला.”

“मी बाबांना सांगितलं, असा-असा एक व्हिडीओ आहे जो प्रचंड व्हायरल होतोय. समलिंगी इंटिमेट सीन आहे आणि त्याची क्लिप व्हायरल होतेय याची माहिती दिली. मी खरंच २-३ दिवस खूप रडले. कारण, पहिल्यांदाच मला खूप ट्रोल करण्यात आलं. बाबांना मी विचारलं, तुम्हाला माझी लाज वगैरे नाही वाटत आहे ना? माझे बाबा तेव्हा एकच वाक्य बोलले आणि मी पूर्ण शांत झाले. ते म्हणाले, हा तुझ्या कामाचा भाग आहे, तू तुझं काम केलंय आता या सगळ्या गोष्टी विसरून जा. माझे बाबा वयाच्या ७५ व्या वर्षी जर माझ्या बाजूने इतका विचार करत असतील. तर, हे लोक मला बोलणारे कोण आहेत. ३ दिवस त्रास झाला त्यानंतर मी या गोष्टी सोडून द्यायचं ठरवलं.”

“त्या क्लिपचा विचार मी कधीच सोडलाय. पण, या सोशल मीडियाच्या ट्रोलर्ससाठी किती सोपं झालंय एखाद्याच्या वैयक्तिक गोष्टीवर चर्चा करणं हा प्रश्न मला नेहमी पडतो. त्यातही अशा सीन्ससाठी महिलांनाच नेहमी का ट्रोल केलं जातं? मी यापूर्वी सुद्धा बोलले आहे जर, एखाद्या पुरुष कलाकाराने असे सीन केले तर, त्याचे व्हिडीओ काढून तुम्ही त्या कलाकारांना ट्रोल करता का? नेहमी तुम्ही महिलांना का ट्रोल करता? खरंच मला वाईट वाटलं. माझ्या कामावर टीका करा, मला चालेल. कारण, माझ्या कामात सुधारणा करणं हे माझं काम आहे.” असं स्पष्ट मत प्रिया बापटने मांडलं आहे.

Story img Loader