Priya Bapat : आपल्या आवडत्या कलाकारांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहणं ही सिनेप्रेमींसाठी पर्वणी असते. ‘विस्फोट’ या थ्रिलर हिंदी चित्रपटातून पहिल्यांदाच रितेश देशमुख आणि प्रिया बापट यांची जोडी प्रेक्षकांना ऑनस्क्रीन पाहता आली. रितेशबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, सेटवर काम करताना अभिनेत्याची कोणती गोष्ट भावली याविषयी प्रिया अमोल परचुरेंच्या ‘कॅचअप’च्या मुलाखतीत भरभरून बोलली आहे.
प्रिया बापट सांगते, “रितेश अभिनेता म्हणून फारच कमाल आहे. मुळात, तो अत्यंत प्रोफेशनल आहे… आपल्या कामाची वेळ अत्यंत काटेकोरपणे पाळतो. ‘विस्फोट’मध्ये फरदीन खान, रितेश देशमुख, संजय गुप्ता हे कलाकार होते. म्हणजेच एकदम बॉलीवूड वातावरणात मी काम केलं. रितेश हा अत्यंत प्रोफेशनल आणि अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. ८ वाजताच्या कॉल टाइमला तो मनुष्य स्वत:चे संवाद पाठ करुन, हातात स्क्रिप्ट घेऊन तयार बसलेला असतो. यामुळे खरंच खूप फायदा होता.”
प्रिया पुढे म्हणाली, “रितेशने आयुष्यात इतकं काम केलंय, त्यात मोठमोठ्या स्टार्सबरोबर त्याने स्क्रीन शेअर केल्या आहेत. आता तो बॉलीवूडच्या या वर्तुळात एकदम सेट आहे. पण, यामध्ये एका नवीन आलेल्या माणसाला तू बाहेरचा आहेस अशी वागणूक न देता, त्याच्याबरोबर रिहर्सल करणं, प्रत्येक सीनसाठी मेहनत घेणं… ही गोष्ट खरंच खूप मोठी असते. त्याच्याबरोबर काम करून मला खूप मजा आली. जर रितेश नसता तर मला माहिती नाही तो चित्रपट कसा झाला असता. त्याच्यामुळे गोष्टी खूप सोप्या झाल्या.”
हेही वाचा : सिद्धार्थ चांदेकरचं टोपण नाव माहितीये का? आई सीमा चांदेकरांनी केला खुलासा, म्हणाल्या, “त्याचा जेव्हा जन्म झाला…”
रितेशची कोणती गोष्ट आवडते?
“मला रितेशची आणखी एक गोष्ट खूप आवडते. मी कधीकधी ती गोष्ट मराठी लोकांमध्ये नाही बघत…पण, रितेशच्या त्या स्वभावाचं खरंच कौतुक करावंसं वाटतं. जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटअपमध्ये भेटतात, तेव्हा अजणातेपणी किंवा मुद्दाम मला माहिती नाही. पण, थोडावेळ मराठी बोलून ते कलाकार नंतर इंग्रजीत संवाद साधतात. तसं, रितेशचं नाहीये… तो आणि मी ‘विस्फोट’च्या सेटवर ९० टक्के मराठी बोलायचो. त्यात तो सर्वांना आदराने आवाज देतो. ‘प्रिया तुम्ही…’ असं त्याच्या तोंडून ऐकल्यावर मलाच नवल वाटायचं. पण, मला त्या माणसाबद्दल प्रचंड आदर आहे…तो खरंच खूप चांगला माणूस आहे. तो ठरवून मराठी बोलतो. माणूस म्हणून तो खरंच ग्रेट आहे. त्याचदरम्यान, तो ‘वेड’साठी काम करत होता. मला त्याने ‘वेड’चं पहिलं पोस्टर दाखवलेलं, आम्ही ‘वेड’बद्दल गप्पा मारायचो. एकंदर त्याच्याबरोबर काम करून मजा आली” असा अनुभव प्रियाने सांगितला.
दरम्यान, ‘विस्फोट’ चित्रपट गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ‘जिओ सिनेमा’ या ओटीटी अॅपवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.