मराठमोळी प्रिया बापट सध्या तिच्या ‘सिटी ऑफ ड्रिम्स’ या वेब सीरिजच्या तिसऱ्या पर्वामुळे चर्चेत आहे. याशिवाय लवकरच ती आणखी एका सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचं नाव ‘रफूचक्कर’ असून यात मनीष पॉल मुख्य भूमिकेत आहे. ही वेब सीरिज १५ जूनपासून जिओ सिनेमावर पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने प्रिया बापटने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ट्रोलिंग व बॉडी शेमिंगबद्दल भाष्य केलं आहे.
हेही वाचा “त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन
ट्रोलिंग व बॉडी शेमिंगला कशी सामोरी जातेस? या प्रश्नावर ‘इंडिया टुडे’शी बोलताना प्रिया म्हणाली, “मी खरंच आता ट्रोलिंगला गांभीर्याने घेत नाही. मला या टप्प्यावर यायला थोडा वेळ लागला जिथे मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते. आता त्यांचा माझ्यावर परिणाम होत नाही. मग ते बॉडी शेमिंग असो की माझ्या कामाबद्दल ट्रोलिंग असो, आता ट्रोलर्सच्या बोलण्याचा मला काहीच फरक पडत नाही.”
पुढे प्रिया म्हणाली, “प्रत्येक कलाकारासाठी या टप्प्यावर पोहोचणं खूप महत्वाचं आहे, कारण तेव्हाच तुम्ही तुमच्या कामावर आणि तुमच्या कलेवर लक्ष केंद्रित करू शकाल. ते आपल्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. अनेक अभिनेत्यांनी हे सिद्ध केलंय की तुम्ही सडपातळ असाल किंवा लठ्ठ असाल तरीही तुमचा अभिनय महत्त्वाचा असतो. त्यामुळे जोपर्यंत माझे कुटुंब माझ्यावर टीका करत नाही तोपर्यंत मी आनंदी आहे. ट्रोलर्सनी ट्रोल केलं तर मी ते वाचून सोडून देते, त्याचा विचार करत नाही.”
दरम्यान, दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून इंडस्ट्रीत सक्रिय असलेल्या प्रिया बापटने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट व सीरिजमध्ये काम केलं आहे. ‘सिटी ऑफ ड्रिम्स’नंतर लवकरच ती ‘रफूचक्कर’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.