प्रिया बापट-उमेश कामत यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये त्यांनी लग्न केलं. चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये दोघांनीही आपल्या अभिनयचा ठसा उमटवला आहे. सध्या त्यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नव्या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. नाटकाला प्रेक्षकांकडून मिळणारा भरघोस प्रतिसाद आणि दिवाळीचं औचित्य साधून प्रियाने नुकतीच रेडीओ मिरची प्लसच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने दिवाळीचा पाडवा कसा साजरा करणार याबद्दल खुलासा केला.
हेही वाचा : “फक्त आई होणं म्हणजे…”, ‘झिम्मा २’मधून उलगडणार सात बायकांची गोष्ट, दमदार ट्रेलर प्रदर्शित
दिवाळी पाडव्याबद्दल सांगताना प्रिया बापट म्हणाली, “पाडव्याला नवऱ्याने मला गिफ्ट द्यावं…अशा काहीच अपेक्षा माझ्या नसतात किंवा व्हॅलेंटाईन डे निमित्त गिफ्ट द्यायला पाहिजे असंही मला वाटत नाही. मला काही फरक पडत नाही…मला काहीही देऊ नका. माझी फक्त एवढीच इच्छा असते की, फक्त पाडव्यालाच नव्हे तर प्रत्येक दिवशी माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काहीतरी खास करावं.”
हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : लक्ष्मीपूजनाला सुभेदारांच्या घरी येणार प्रतिमा, सायलीला लागणार आईची चाहूल, पाहा प्रोमो…
प्रिया पुढे म्हणाली, “प्रत्येकवेळी त्याने मला काहीतरी गिफ्ट द्यावं अशी माझी अजिबात इच्छा नसते. पण, काहीवेळा एक मिठी, रस्त्यावरून चालताना हात पकडला असं काहीही करावं ज्याने मला छान वाटेल. याच्या पलीकडे माझ्या काहीच अपेक्षा नसतात.”
“माझ्या नवऱ्याने दिवाळीला गिफ्ट द्यावं, पाडव्यात ओवाळणीत काय देणार, पुन्हा गुढीपाडव्याला काय देईल? अशा कोणत्याच अपेक्षा माझ्या नसतात. मी घरी फराळ करते…मी केलेला सगळा फराळ त्याला आवडतो. गणपतीत सुद्धा असंच वातावरण असतं त्यामुळे पाडव्यानिमित्त असं काही वेगळं आम्ही करत नाही.” असं प्रिया बापटने सांगितलं. बायकोचं उत्तर ऐकून उमेशने यावर “मी किती लकी आहे बघा…” अशी प्रतिक्रिया दिली.