मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये प्रिया बापटचं नाव आवर्जुन घेतलं जातं. चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज या प्रत्येक माध्यमांमध्ये प्रियाने उत्तम काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. कामामुळे सतत चर्चेत असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. तसेच सोशल मीडियाद्वारे ती व्यक्त होताना दिसते. प्रिया तिच्या खासगी आयुष्याबाबतही व्यक्त होताना दिसते. आताही तिने शेअर केलेल्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
प्रियाने वडिलांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे. तसेच तिने तिची बहीण व वडिलांबरोबरचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये प्रिया तिच्या वडिलांबाबत भरभरुन बोलली आहे. शिवाय प्रियाने लग्नानंतर तिचं आडनाव का नाही बदललं? याचंही कारण सांगितलं आहे. प्रियाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
आणखी वाचा – ‘The Kerala Story’च्या कमाईत तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; जमवला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
प्रिया म्हणाली, “प्रिय बाबा, आज तुमचा ८१वा वाढदिवस. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा. मी कितीही आईवेडी असले तरीही माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं अगदी वेगळं आहे. प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे माझे बाबा. अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा”.
प्रिया बापटची पोस्ट
“माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंगच्या सेटवर घेऊन जाणारे आणि B. A Economics केल्यानंतर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरणारे. तरीही मी चित्रपट क्षेत्राची निवड केल्यानंतर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे बाबा. खरंतर खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे यायचे, तेव्हा मला पालकाच्या भूमिकेत बघायचे. विश्वास, जबाबदारी आणि प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे बाबा”.
आणखी वाचा – ‘द केरला स्टोरी’मधील व्हिलन ‘आसिफा’ खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड बोल्ड; चित्रपटासाठी घेतलं ‘एवढं’ मानधन
पुढे प्रिया म्हणाली, “मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं? कारण शरद बापट यांची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे. बाबा, तुम्ही मला ‘प्रिया’ म्हंटलत आणि ‘प्रिया शरद बापट’ ही ओळख दिलीत जी मी आयुष्यभर जपेन”. प्रियाच्या या पोस्टनंतर तिच्या वडिलांना नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.