प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. प्रिया आणि उमेशने जवळपास ८ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०११ मध्ये लग्न केलं. सध्या हे जोडपं त्यांच्या नव्या नाटकामुळे चांगलंच चर्चेत आहे. प्रियाने ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या निमित्ताने जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांच्या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याच नाटकाच्या निमित्ताने दोघांनीही अलीकडेच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी प्रियाने प्रेमाबद्दल आपलं मत मांडत नवऱ्याविषयी अनेक खुलासे केले.
प्रिया बापटने रेड एफला दिलेल्या मुलाखतीत प्रेमाबद्दल आणि नाटकाच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगितलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “नाटकात मी राधाची भूमिका साकारत आहे आणि राधासारखं आपण प्रत्येकाने प्रेम व्यक्त केलं पाहिजे. राधाची भूमिका मला खूप रिलेट होते. मला नेहमी वाटतं उमेशने सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त करावं. चार लोक बघत असताना त्यानं मला बायको म्हणून जवळ घेतलं तर काय फरक पडतो?”
हेही वाचा : “ते यान चंद्रावर व्यवस्थित लँड झालं तसं…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“उमेशला मी अनेकदा तू प्रेम व्यक्त करत नाहीस असं बोलायचे. त्यामुळे एकदा मॉलमध्ये आम्ही सरकत्या जिन्यावरुन वरच्या माळ्यावर जात होतो. त्यावेळी सगळेजण माझ्याकडे पाहत होते. त्यांना माझा फोटो काढू की व्हिडीओ हे कळत नव्हतं, तेव्हा उमेशने अचानक काय गं माझी बायको असं बोलून माझा हात हातात घेतला. सगळेजण आमच्याकडे बघत होते. मी त्याला म्हणाले, अरे! थांब लोक व्हिडीओ काढतील पण, उमेशचं म्हणणं होतं काढू देत तुला वाटतं ना… मी प्रेम व्यक्त नाही करत म्हणून केलं.” असा नवऱ्याबद्दलचा मजेशीर किस्सा प्रिया बापटने सांगितला.
दरम्यान, ‘जर तरची गोष्ट’ या नाटकात प्रिया बापट, उमेश कामत, पल्लवी अजय, आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नाटकाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून, दिग्दर्शन अद्वैत दादरकर आणि रणजित पाटील यांनी केले आहे. या नाटकात प्रिया बापट ‘राधा’, तर उमेश कामत ‘सागर’ ही भूमिका साकारत आहे.