चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि नाटक अशा चारही माध्यमांतून प्रिया बापटने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेत्रीने मराठीसह बॉलीवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या प्रिया ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याचा विषय तरुण पिढीवर आधारित असल्याने सध्या या नाटकाला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळत आहे. ठिकठिकाणी या नाटकाचे प्रयोग देखील हाऊसफुल असतात. परंतु, प्रियाने नुकत्याच शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
नाटकाचा प्रयोग हाऊसफुल असल्यावर नाट्यगृहात प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यादरम्यान काही प्रेक्षक सामाजिक भान न बाळगता नाट्यगृह अस्वच्छ करतात. याबद्दल प्रियाने इन्स्टाग्रामवर संतप्त पोस्ट शेअर केली आहे. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये नाट्यगृहाची कचऱ्यामुळे झालेली दुरावस्था पाहायला मिळत आहे.
नाट्यगृहात सर्वत्र थंडपेयांच्या रिकाम्या बाटल्या व कचरा टाकल्याचं प्रियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दिसत आहे. “नाट्यगृह स्वच्छ ठेवणे ही प्रेक्षकांचीही जबाबदारी आहे. कचरा कचरापेटीत टाकावा, नाट्यगृहात नाही. ही साधी गोष्ट आपल्याला कधी कळणार?” असा सवाल उपस्थित करत प्रियाने संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी प्रियाप्रमाणे आणखी काही मराठी कलाकारांनी देखील नाट्यगृहातील अस्वच्छतेबाबत पोस्ट शेअर केल्या होत्या.
दरम्यान, प्रिया बापटच्या या नव्या नाटकाबद्दल सांगायचं झालं, तर ‘जर तरची गोष्ट’च्या निमित्ताने अभिनेत्रीने जवळपास १० वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलं आहे. यामध्ये प्रियासह उमेश कामत, पल्लवी अजय व आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.