अभिनेत्री प्रिया बापट सध्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या तिसऱ्या सीझनमुळे चांगलीच चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्रियाने पौर्णिमा गायकवाड या खंबीर व्यक्तिमत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजच्या तिन्ही भागांना मिळालेल्या घवघवीत यशानंतर अभिनेत्रीने अलीकडेच चित्रपटसृष्टीतील संघर्ष आणि भविष्यातील आव्हानांबाबत भाष्य केले आहे.
प्रिया बापटने नुकताच ‘SheThePeople’यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रियाने तिने बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत कशी सुरुवात केली याबाबत माहिती दिली. पुढे संघर्षाबाबत सांगताना अभिनेत्री म्हणाली, “प्रत्येक कलाकाराने आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे गरजेचे असते कारण कलाकाराच्या आयुष्यातील संघर्ष हा न संपणारा असतो, तो कधीही संपत नाही. प्रत्येकाला याचा अनुभव आला असेल. मी स्वत: बालकलाकार, त्यानंतर मराठी इंडस्ट्री पुढे हिंदी कलाविश्वात काम केले पण, हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.”
हेही वाचा : ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’च्या यशानंतर प्रसाद ओकने केली नव्या चित्रपटाची घोषणा, पहिले पोस्टर आले समोर
प्रिया पुढे म्हणाली, “२०१८ मध्ये नागेश कुन्नूर यांनी मला ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या रुपाने संधी दिली. तुम्हाला आयुष्यात तुमच्यावर विश्वास ठेवू शकेल अशा दिग्दर्शकाची गरज असते. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील पौर्णिमा हे लोकप्रिय पात्र साकारूनही माझा संघर्ष संपलेला नाही. आता भविष्यात चित्रपटसृष्टीत काम करताना मला आणखी लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. या प्रवासात चांगले दिग्दर्शक, प्रोडक्शन हाऊस यांच्याबरोबर काम करायला नक्कीच आवडेल. मला आणखी नवनवीन भूमिका साकारायला नक्कीच आवडेल.”
हेही वाचा : “…तर शाहरुख खानने VHP आणि बजरंग दलाला १०० कोटी द्यावे”, बॉलीवूड अभिनेत्याचे ‘जवान’ चित्रपटाबाबत मोठे वक्तव्य
दरम्यान, सिटी ऑफ ड्रीम्सनंतर प्रिया लवकरच रितेश देशमुखबरोबर विस्फोट चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढच्या वर्षी रिलीज करण्यात येईल.