मराठीसह बॉलीवूडमध्ये अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणून प्रिया बापटकडे पाहिलं जातं. वैयक्तिक आयुष्यात प्रियाने २०११ मध्ये उमेश कामतशी लग्न केलं. प्रिया-उमेश यांच्या जोडीकडे कलाविश्वात आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. लग्नानंतर उत्तमरित्या संसार करत प्रियाने अनेक वेबसीरिज, नाटक व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या प्रवासात नवऱ्याची तिला खंबीर साथ लाभली. आजच्या घडीला नोकरी व घराबाहेर राहून काम करणाऱ्या स्त्रियांना नेमक्या कोणत्या अडचणी येतात? याशिवाय त्यांनी संसार व करिअर या दोन्ही गोष्टींचा मेळ कसा साधावा याविषयी प्रिया बापटने आरपार युट्यूब चॅनेलच्या ‘वूमन की बात’ या कार्यक्रमात भाष्य केलं आहे.
प्रिया बापट सांगते, “घर सांभाळायची जबाबदारी ही नेहमी दोघांची असते. म्हणजे निर्णय बायकोने घ्यायचा आणि पैसे नवऱ्याने द्यायचे हे मला मान्य नाही. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी दोघांनी घ्यायची असते. मला असं वाटतं की, कोणंतही नातं जपण्यासाठी दोघांनी पुढाकार घेतला पाहिजे. दो पहियो की गाडी म्हणतो ना आपण…अगदी तसंच संसार करताना सुद्धा दोघांनी एकत्र चाललं पाहिजे. यामुळे नात्यांची गंमत जास्त कळते. दोघांना जबाबदारी समजली की, नात्यात कोणीच वरचढ ठरत नाही. दोघेही बरोबर संसार करतात.”
प्रिया पुढे म्हणाली, “जर एखाद्या बाईची काम करायची इच्छा नसेल आणि तिला स्वत:हून फक्त घर सांभाळायचं असेल तर गोष्ट वेगळी आहे. पण, एखादी बाई बाहेर जाऊन काम करत असेल, तुमच्याएवढे पैसे कमवत असेल, तर त्या बाईचं आर्थिक आणि भावनिक योगदान संसारात लाभलं पाहिजे. लग्नानंतर उमेश आणि माझ्या संसारात प्रत्येक गोष्टी दोघांचं नाव असतं. घर घेतलं, गाडी घेतली सगळीकडे आम्ही ५०-५० टक्के पैसे दिले. अशा पद्धतीने आम्ही जबाबदारी स्वीकारतो.”
हेही वाचा : “माझ्यात हिंमत नव्हती पण…”, KBC च्या मंचावर अमिताभ बच्चन झाले भावुक, शेवटच्या भागात प्रेक्षकांना म्हणाले…
“लग्नानंतर घरात नेहमी सगळ्या अपेक्षा स्त्रियांकडूनच का केल्या जातात? याचं उदाहरण सांगायचं झालं, तर शूटिंग करा, नोकरी करा किंवा काहीही करा पण पाहुणे येणार असतील तर स्वयंपाक करून ठेवला आहेस ना? किंवा स्वयंपाक करणाऱ्या बाईला काय-काय जेवण बनवायचं हे सांगितलंय ना? असं नेहमी स्त्रियांनाच विचार जातं. या जबाबदाऱ्या बायकांवरच का असतात, एखाद्या पुरुषाने स्वयंपाकात लक्ष दिलं तर काय फरक पडतो? इथेही कामं वाटून केली पाहिजेत. पूर्वी गोष्टी वेगळ्या होत्या पण, आताच्या काळात पुरुषांनी सगळं शिकलंच पाहिजे. पैसे यांनी कमवायचे आणि घर यांनी चालवायचं असे निर्णय लहानपणापासून मी माझ्या घरात कधीच पाहिले नाहीत. अशाच पद्धतीने एकमेकांना समजून घेऊन संसार सगळ्या घरांमध्ये झाला पाहिजे.” असं प्रियाने सांगितलं.