राजकीय विषयावर आधारित असलेल्या ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये प्रिया बापटने पूर्णिमा गायकवाड ही दमदार भूमिका साकारली होती. या सीरिजचे आतापर्यंत तीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यातील प्रियाच्या अभिनयाचं विशेष कौतुक करण्यात आलं. प्रिया मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नाटक, चित्रपट, मालिका, सीरिज अशा सगळ्या माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे.
प्रिया बापट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील प्रत्येक अपडेट ती तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कारण, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या घवघवीत यशानंतर प्रिया बापट लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करणार आहे.
हेही वाचा : “…आणि माझ्या आयुष्यात राजकुमार आला”, नम्रता संभेरावची नवऱ्यासाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाली, “त्याने मला…”
प्रिया बापटला थेट बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर काम करण्याची संधी मिळाली आहे. इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रियाने तिच्या आगामी प्रोजेक्टची खास झलक शेअर करत “मी या संपूर्ण प्रवासासाठी खूपच उत्साही आहे” असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
प्रिया बापट बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दिन सिद्दिकीबरोबर काम करणार असल्याचं पाहून तिच्या चाहत्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करण्यास सुरूवात केली आहे. नवाजुद्दिन सिद्दिकीने देखील प्रिया बापटचा खास फोटो शेअर करत आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. त्याने शेअर केलेल्या फोटोवर “नवाज सर तुमच्याबरोबर काम करणं ही मोठी गोष्ट आहे” असं प्रियाने म्हटलं आहे. ‘प्रोडक्शन ८’ हा थ्रिलर प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.