मराठी सिनेसृष्टीवर दोन दशकं अधिराज्य गाजवणारे लक्ष्मीकांत बेर्डे आजही मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहेत; जे पिढ्यान पिढ्या टिकून असेल. आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदी शैलीने लक्ष्मीकांत बेर्डेंनी रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. दुःख मनात ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसवत ठेवण्याचा वसा त्यांनी जणू हाती घेतला होता. लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव ऐकलं तरी आपसूक मनात एक खंत निर्माण होते की, आज ते आपल्यात का नाहीत? नुकत्याच एका मुलाखतीमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी प्रिया बेर्डेंनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

प्रिया बेर्डे यांनी ‘लोकमत फिल्मी’शी नुकताच संवाद साधला. यावेळी त्यांना विचारलं की, लक्ष्मीकांत बेर्डेंनी दिलेली एखादी साडी, दागिना किंवा भेटवस्तू तुम्हाला आठवतेय का? आणि त्या गोष्टी तुमच्याबरोबर अजूनही आहेत का? यावर प्रिया बेर्डे म्हणाल्या, “हो. काही साड्या आहेत. पण ते कधी असं मला बाहेर घेऊन जायचे आणि खरेदी करायचे, हे शक्यचं नसायचं. परंतु ते असताना त्याच्या आवडत्या रंगाच्या साड्या भरपूर खरेदी केल्या आहेत. त्यातल्या दोन-तीन साड्या माझ्याकडे अजूनही आहेत.”

पुढे प्रिया बेर्डे म्हणाल्या की, दागिन्यांचं म्हणायला गेलं तर, मला त्याची खूप हौस आहे. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र होती. त्यामधील एक-दोन अजूनही माझ्याकडे आहेत. हे सगळं मी एक आठवण म्हणून ठेवून दिलेलं आहे. माझ्याकडे बाजूबंदपासून, हार सगळं आहे. मला आता स्वतःला असं वाटतं, मधल्या काळामध्ये पारंपरिक दागिन्यांची क्रेझ नव्हती. पण आता मला पुतळीचा हार, ठुशी , चपला हार, मोहनमाळ असे दागिने करायचे आहेत. जे मी नक्कीच करणार आहे. कारण मला ते फार आवडतं. जुन्या चित्रपटांमध्ये ते दिसतात. भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांमध्ये, प्रभातच्या चित्रपटांमध्ये पाहिलेले ते दागिने आता बघायला मिळत नाहीत. त्यामुळे आता मला ते पारंपरिक दागिने करून घ्यायचे आहेत.

दरम्यान, प्रिया बेर्डे यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या वर्षी त्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकल्या होत्या. प्रिया बेर्ड यांनी या मालिकेत सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे ही भूमिका साकारली होती.

Story img Loader