अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सात वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत त्या झळकल्या आहेत. सिंधुताईंच्या आजी म्हणजेच पार्वती साठे यांच्या भूमिकेत प्रिया पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला त्या भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्यासाठी खूप काम करीत आहेत. नुकतीच त्यांनी एका यूट्युब चॅनेलवर मुलाखत दिली. त्यावेळी प्रिया यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंच्या निधनानंतर एका रात्री अभिनय याच्या कृतीतून कशी प्रेरणा मिळाली याचा किस्सा सांगितला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं शिक्षण माहितेय? जाणून घ्या

‘अमुक तमुक’ या यूट्युब चॅनेलवरील नव्या मुलाखतीमध्ये ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेतील कलाकार सहभागी झाले होते. त्यात प्रिया बेर्डे यांच्याबरोबर किरण माने आणि बालकलाकार अनन्या टेकवडे हेही उपस्थित होते. यावेळी तुम्हाला कशातून प्रेरणा मिळते? यावर चर्चा झाली. त्यादरम्यान प्रिया बेर्डे यांनी त्या प्रेरणादायी रात्रीचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “माझ्या आई-वडिलांचं खूप आधीच निधन झालं होतं. माझी आजी माझ्याबरोबर होती. पण, तिचं ५ जुलैला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचं १६ डिसेंबरला निधन झालं. त्यानंतर माझ्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली होती; ती पोकळी सगळ्या बाजूनं कशानं भरून काढायची, हा प्रश्न पडला होता. आता आपल्या आयुष्यात आर्थिक, मानसिक अशा सगळ्याचं बाजूनं पुढे काय? काही नाही, असं वाटू लागलं होतं. दोन मुलं कशी मोठी करायची? सांभाळायचं कसं? हे सगळं एकदा विचार करीत बसलेली असताना स्वानंदी म्हणाली, ‘मम्मी पप्पा कुठे गेले?’ तेव्हा अभिनय म्हणाला, ‘थांब, तुला दाखवतो; इकडे ये.’ मग तो तिला खिडकीजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, ‘ते आकाशात तारे दिसतायत ना; त्यातले एक आपले पप्पा आहेत.’ हे पाहून मला असं वाटलं की, अरे यार, या एवढ्याशा मुलाला एवढी अक्कल आहे. आपल्या बहिणीला तो इतकं काही सांगतोय. त्याला स्वानंदी असंही विचारायची, ‘आपले पप्पा कधी परत येणार?’ तेव्हा अभिनय म्हणायचा, ‘तू दहावीला गेल्यावर आपले पप्पा परत येणार.’ पण जेव्हा ती दहावीला गेली तोपर्यंत तिला कळलं होतं की, आपले पप्पा काही परत येणार नाहीत. पण तो दिवस आणि ती रात्र माझ्यासाठी खूप प्रेरणादायी होती.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर रीलसाठी केली जाते अशी तयारी; जुई गडकरी व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

पुढे प्रिया म्हणाल्या, “अभिनयला माहीत असलेलं नात्याबद्दलचं महत्त्व किंवा छोट्या मुलीला समजावून सांगण्याचं कौशल्य हे पाहून मला असं झालं की, आपण किती खचतो आहोत. ही सोन्यासारखी आपली गोंडस मुलं आहेत. त्यामुळे आता त्यांना मला काहीही करून चांगल्या पद्धतीनं मोठं करायचं आहे.”

हेही वाचा – ‘ताली’ वेब सीरिज पाहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “तृतीयपंथीयांच्या पालकांना…”

“मी त्या वेळेला खूप खचले होते. मला काहीच कळतं नव्हतं. मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता. पैसे वगैरे काही नव्हतं. अशा प्रसंगी त्या दोन मुलांकडे बघून मी म्हटलं की, नाही यार प्रिया आता तुला उभं राहायचं आहे. आता खूप झालं, खूप रडलीस. शिवाय सगळ्यांसाठी सगळं करून झालं. मनामध्ये कुठलीही खंत नाही की, एखादी गोष्ट माझ्याकडून राहिली. मी सगळ्यांसाठी सगळं केलं होतं, सेवा केली होती. पण, आता माझ्या मुलांसाठी आणि स्वतःसाठी उभं राहायचं, असं मी ठरवलं. ती रात्र मी आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. तो दिवस आणि ती रात्र खरंच प्रेरणादायी ठरली,” असं प्रिया बेर्डे म्हणाल्या.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Priya berde share the story of that night after the death of laxmikant berde pps
Show comments