सुबोध भावे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांचा ‘फुलराणी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘तुझ्या सोबतीचे’ हे गाणं दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं. या गाण्यात सुबोध व प्रियदर्शिनीचा रोमान्स प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सुबोध भावेबरोबर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणाऱ्या प्रियदर्शिनीने या रोमँटिक सीनबद्दल भाष्य केलं.
‘मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शिनी म्हणाली, “मला सेटवर गेल्यावर पहिला प्रश्न पडलेला की मी सुबोधला दादा म्हणू की सर म्हणू. सर म्हटलं तर ते खूपच फॉर्मल होतं. दादा म्हटलं तर लव्ह सीन कसे करायचे, असे प्रश्न मला पडलेले. नंतर तो सुबोधदादा कधी झाला, ते माझं मलाच कळलं नाही. आम्ही पहिलाच सीन शूट केला तो रोमँटिक होता. त्यामुळे पहिलाच सीन असा कसा करायचं, असं मला वाटतं होतं. मी वाक्यांची रिहर्सल केली होती आणि सीन सुरू झाला. मी त्याच्या डोळ्यांत पाहिलं तर तो कॅरेक्टरमध्ये होता, तो कोणत्याही रिहर्सलशिवाय शूटिंगसाठी तयार होता, त्यामुळे आपल्यालाच मेहनती घ्यावी लागणार हे मला कळलं होतं.”
प्रेम ही अवघड भावना आहे, ती दाखवायची कशी, तुम्हाला ती फील करावी लागते, दुसरा पर्याय नसतो. मला रिहर्सल करावी लागायची, पण तो नेहमी टेकमध्ये प्रेमात पडलेला असायचा. त्याला मेहनत घ्यावी लागायची नाही. सीनमध्ये तो माझ्या किती प्रेमात आहे, हे दिसायचं आणि कट झाला की म्हणायचा, ए चल तुला जोक सांगतो. त्याने सेटवर खूप कंफर्ट झोन तयार केला होता. जेव्हा जेव्हा मी घाबरलेय असं दिसायचं, तेव्हा तो मला कोपऱ्यात नेऊन सगळं व्यवस्थित चाललंय हे सांगायचा. प्रेशर घ्यायचं नाही, हे सगळं असणार त्यापुढे जाऊन आपण काम करायचं, असा सल्ला सुबोधने दिल्याचं प्रियदर्शिनीने सांगितलं.
टेक्निकल गोष्टींमध्ये अडकायचे तिथेही तो मदत करायचा. जज करू नकोस, कॅमेऱ्यासाठी सीन्स कर असं तो सांगायचा. त्याच्याबरोबर काम करण्याचा अनुभव चांगला होता, असं प्रियदर्शिनी म्हणाली.