अभिनेता अंकुश चौधरी(Ankush Choudhary) हा त्याच्या वेगळ्या धाटणीच्या भूमिकांसाठी ओळखला जातो. आता तो लवकरच तो एका नव्या चित्रपटातून वेगळ्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पी. एस. आय. अर्जुन’ असे या चित्रपटाचे नाव आहे. वर्दीतील त्याचे पोस्टर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. आता या चित्रपटाचा एक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘पी. एस. आय. अर्जुन’चे एक पोस्टर शेअर करण्यात आले होते. त्या पोस्टरला ‘अर्जुन माझ्या नावात, वर्दी माझी जोमात, गुन्हेगार कोमात’, अशी जबरदस्त कॅप्शन दिल्याचे पाहायला मिळाले.

अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील हा डॅशिंग लूक कमाल दिसत असून, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. अंकुशला अशा नव्या रूपात बघून, त्याचे चाहतेही सुखावले आहेत. इतकेच नाही, तर अभिनेता रितेश देशमुखलाही अंकुशच्या या नव्या लूकने भुरळ घातली आहे. आता या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

या टीझरच्या सुरुवातीला अंधार दिसतो. त्यामध्ये एक व्यक्ती घराच्या कौलावरून चालत असल्याचे दिसते. तसेच ऐकायला येते की, कौलारू घर असलं ना, तर हलक्या अंगानं चालावं लागतंय. पिंडाला शिवायला कावळा आलाय. मग सुरू होतो खजिन्याचा शोध आणि मग लुटने का और कटने का…, यानंतर कोणीतरी चोर चोर म्हणत ओरडताना दिसते. टीझरमध्ये पुढे पोलिसांची गाडी पाहायला मिळते. अंकुश चौधरीचा आवाज ऐकायला येतो. तो म्हणतो, चोर दोन प्रकारचे असतात. एक पैशासाठी चोरी करतात आणि दुसरे ज्यांना चोरी ही नशा वाटते. पुढे किशोर कदम यांचा आवाज ऐकायला येतो. ते म्हणतात की, कारण- चोरीत जी नशा आहे, ती बाई आणि बाटलीतसुद्धा नाही. किशोर कदम यांची झलक यात पाहायला मिळते. ते कोणाला तरी सांगतात की चोरी म्हणजे गंमत नाही. टीझरमध्ये एक अॅक्शन सीन पाहायला मिळत आहे. अंकुश चौधरी म्हणतो, “असं करायचं नाही, थांब म्हटलं की थांबायचं.” या टीझरमध्ये अभिनेत्री अक्षया हिंदळकरचीही एक झलक पाहायला मिळत आहे.

अक्षया हिंदळकर नुकतीच झी मराठी वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसली होती. आता ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेत दिसत आहे.

भूषण पटेल दिग्दर्शित ‘पी.एस.आय.अर्जुन’ सिनेमाची व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रीमविव्हर एंटरटेन्मेंट यांनी निर्मिती केली आहे. विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत. ९ मे २०२५ ला ‘पी. एस. आय. अर्जुन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.