मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ व यशस्वी दिग्दर्शक म्हणून पुरुषोत्तम बेर्डे यांना ओळखलं जातं. ९० च्या दशकांत त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. १९८३ मध्ये त्यांच्या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर ‘टूरटूर’ हे नाटक आणलं. याच नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंना देखील घराघरांत एक वेगळी ओळख मिळाली होती. सुरुवातीला या नाटकाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु, कालांतराने हे नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजलं. अशा या लोकप्रिय दिग्दर्शकाने नुकतीच ‘सिनेमागल्ली’ (CinemaGully) या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी मराठी कलाविश्वात झालेले बदल, आर्थिक गणितं यावर त्यांनी भाष्य केलं.
मराठी सिनेमाविश्वातील तेव्हाचं (जुन्या काळातील) अर्थकारण आणि आजचं अर्थकारण या प्रश्नाचं उत्तर देताना पुरुषोत्तम बेर्डे सांगतात, “एखादा सिनेमा त्याकाळी चालला, तर फायदेशीर ठरायचं आणि नाही चालला तर माणसाला पाणीही पिता येणार नाही एवढा मोठा तोटा व्हायचा. आजही सर्वत्र तशीच परिस्थिती आहे. या सगळ्यात निर्मात्यांना किती पैसे मिळतात हा आजही प्रश्नच आहे. निर्माता फक्त सिनेमा बनवतो त्यानंतर मग पुढे, फायनान्सर वगैरे असे अनेक टप्पे असतात. हिंदीमध्ये जरुर पैसा मिळत असेल कारण, तिथे अनेक नियम व अटी असतात. पण, मराठी सिनेमांच्या बाबतीत असं होत नाही.”
हेही वाचा : ‘झी मराठी’ सुरू होणार ‘नवरी मिळे हिटलरला’! निर्माती शर्मिष्ठा राऊतने शेअर केला सेटवरचा व्हिडीओ; म्हणाली…
“मराठी सिनेमा पुन्हा एकदा ठराविक लोकांच्या हातात गेला आहे. नानूभाई, संजय छाब्रिया, चॅनेल्सच्या हातात सगळं अर्थकारण आहे. यापैकी नानूभाई जयसिंघानी हे निर्माते आहेत त्यांना ‘निशाणी डावा अंगठा’ हा चित्रपट दाखवल्यानंतर ते काहीच न बोलता माझ्या तोंडासमोरून निघून गेले. त्यांनी मला चित्रपट कसा झालाय हे सुद्धा सांगितलं नव्हतं. त्यांच्या दृष्टीने तो चित्रपट अतिशय फालतू होता असे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसले. अशा लोकांच्या हातात इंडस्ट्री असल्यावर तुम्हाला काय मिळणार?” असा सवाल पुरुषोत्तम बेर्डेंनी उपस्थित केला आहे.
पुरुषोत्तम बेर्डे पुढे म्हणाले, “आजची इंडस्ट्री ही अशाप्रकारे कोणाच्या तरी हातामध्ये आहे. पूर्वी वितरक वेगळे होते. या सगळ्यात महेश कोठारे सारख्या दिग्दर्शकाचा वितरकांवर वचक असायचा. त्याचा त्याला खूप फायदा झाला. अलका कुबल, समीर आठल्ये यांनी चित्रपटाची निर्मिती केल्यावर ते दोघंही गावोगावी फिरले आहेत. पण, आता परिस्थिती बदलली आहे.” असं स्पष्ट मत पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं आहे.