अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) हा ‘जबरदस्त’, ‘वेल डन बेबी’, ‘अदृश्य’, ‘इट्स टू मच’, ‘ऐसी भी क्या जल्दी है’, ‘डोन्ट वरी बी हॅपी’, ‘बापमाणूस’, ‘मुसाफिरा’, ‘सून लाडकी सासरची’, ‘द एआय धर्मा स्टोरी’ अशा चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याबरोबरच अभिनेत्याने ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमधूनदेखील प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता पुष्कर जोग लवकरच त्याच्या नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हार्दिक शुभेच्छा, असे या चित्रपटाचे नाव आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने एकीकडे मराठी चित्रपटसृष्टीची स्थिती फारशी चांगली नसताना त्याला परदेशांत चित्रपट शूट करणं कसं परवडतं, यावर अभिनेत्याने वक्तव्य केले आहे.
ते पैसे लावतात आणि त्यांना मेकर्स…
अभिनेता पुष्कर जोगने नुकतीच ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, एकीकडे असं सतत बोललं जातं की मराठी सिनेमाला प्रेक्षक नाहीत, मराठी चित्रपटसृष्टीची स्थिती फारशी चांगली नाहीये आणि दुसरीकडे पाच-सहा महिन्यांतून तुझा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो आणि तुझे सिनेमे हे परदेशांत शूट केलेले असतात. त्यावर बोलताना पुष्कर जोग म्हणाला, “निर्माता म्हणून बाहेर जाऊन शूट करणं आव्हानात्मक आहे. अॅमस्टरडॅम, पॅरिससारख्या ठिकाणी शूट झालेली ही पहिली मराठी फिल्म आहे. आयफेल टॉवर पडद्यावर दिसणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. मला वाटतं की, निर्मात्यानं स्मार्ट प्रोड्युसर असणं गरजेचं आहे. नुसते पैसे लावले म्हणून तुम्ही निर्माते होत नाही. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक वेळेसाठी असलेले निर्माते खूप आहेत, ते पैसे लावतात आणि त्यांना मेकर्स फसवतात. मी कोणाचं नाव घेत नाही. पण, त्या-त्या बजेटमध्ये चित्रपट बनत नाहीत. पैशांचा नीट वापर केला जात नाही. समजा, तीन कोटींचा चित्रपट असेल, तर तो बनता-बनता प्रदर्शित होईपर्यंत पाच-साडेपाच कोटी खर्च होतात. त्यामुळे प्रोड्युसर खचतो आणि म्हणतो मला हे क्षेत्र नको. त्यात कलाकारांचे नखरे असतात. थिएटर्स मिळत नाहीत. या सगळ्याचा त्रास निर्मात्याला होतो.”
“मला कसं जमतं, तर मी खूपच प्रामाणिकपणे माझं काम करतो, माझ्या निर्मात्याचा एक रुपयाही वाचवला, तर मला खूप आनंद होतो. मी खूप प्रामाणिकपणे चित्रपट करतो. माझं बजेट परवडणारं असतं. जिथे मला माहीत आहे की, माझी सॅटेलाईट किंमत काय आहे, त्या बजेटमध्ये मी चित्रपट बनवतो.” पुष्कर जोग हा अभिनयाबरोबरच दिग्दर्शन व निर्माता म्हणूनही ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांची विशेष बाब अशी की, त्याचे चित्रपट हे परदेशांत शूट झालेले दिसतात. त्यावर अनेकदा अभिनेत्याने वक्तव्यही केलेले आहे. पुष्कर जोग त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो.
दरम्यान, हार्दिक शुभेच्छा या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे पुष्कर जोगबरोबर प्रमुख भूमिकेत दिसली आहे. त्याबरोबरच विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, अनुष्का सरकटे, पृथ्विक प्रताप, विजय पाटकर, भरत सावळे व किशोरी अंबिये हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकात आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.