अभिनेता पुष्कर जोग(Pushkar Jog) हा त्याच्या चित्रपटांबरोबरच त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतो. विविध मुलाखती, सोशल मीडिया या माध्यमांतून तो विविध विषयांवर भाष्य करत असतो. अनेकदा त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे तो चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीतील त्याचे वक्तव्य चर्चेत आहे. मराठी चित्रपट, तिथे होणारे लॉबिंग, कलाकारांचे सेटवरील वागणे याबद्दल त्याने वक्तव्य केले आहे.

मराठी चित्रपट निर्मात्यांना तुम्ही पाण्यात बघता…

पुष्कर जोगने कांचन अधिकारी यांच्या बातों बातों में या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत बोलताना अभिनेत्याने म्हटले, “बिग बॉसनंतर मी दोन चित्रपट केले, त्यामध्ये मला खूप वाईट अनुभव आला. त्यावेळी मला स्वत:ला वचन दिलं की अमुक एखादी व्यक्ती किंवा कलाकार माझ्या सेटवर येऊन माझ्या क्रूला शिव्या घालत असेल किंवा माझे वातावरण नकारात्मक करत असेल, तेव्हा मी शूटिंग थांबवेन, नुकसान सहन करेन; पण कोणताही कलाकार माझ्या साऊंड मॅनला शिव्या देऊ शकत नाही. कोणताही कलाकार माझ्या मेकअप मॅनचा अनादर करू शकत नाही. कारण माझ्यासाठी माझं क्रू माझं कुटुंब आहे. तुम्ही कितीही मोठे असाल तरी मला फरक पडत नाही. मी माझं स्वत:चं काम तयार करतोय. जे लोकं हे करतात, मला तसंही काम देत नाहीत. जे कलाकार आहेत, जे नखरे करतात, ते त्यांच्या कर्माने जाणार आहेत. त्यांनाही माहितेय की मी कोणाबद्दल बोलतोय. तर मला जो अनुभव आला ना तेव्हा मला समजलं की अशा वातावरणात काम होत नाही.”

पुढे पुष्कर जोगने म्हटले, “मी एवढे चित्रपट निर्माण केले, पण मला प्रॉफिट कशातही झाले नाही. कदाचित नुकसानच झालं असेल. पण, मी थांबणार नाहीये. कारण मला प्रेम, आदर हे माझ्या मराठी प्रेक्षकांमुळेच मिळाले आहे. या महाराष्ट्राने मला ती प्रसिद्धी दिली. गेली १२ वर्षे मी मुंबईत राहतो. मला ते जाणवतंय की अमराठी लोकं महाराष्ट्रात राहतात. आनंदाने राहा, मला त्याची काही समस्या नाही. पण, इथे येऊन आम्हालाच शहाणपणा नका शिकवू. मराठी चित्रपट निर्मात्यांना तुम्ही पाण्यात बघता हे मला जाणवलं. एका मराठी माणसाने फिल्म इंडस्ट्री सुरू केली आहे. साऊथ किंवा बॉलीवूडवाल्यांनी केली नाहीये. आता तुम्ही आम्हालाच पाण्यात बघणार असाल तर मी बोलणारच, तो माझा हक्क आहे. मला त्या गोष्टीचा इतका राग आहे. प्रामाणिकपणे मी सगळ्यांना सांगतो की, मराठी फिल्म इंडस्ट्रीने आपण एकत्र येण्याची गरज आहे, पण ते होत नाही. कारण लोकांमध्ये खूप अहंकार आहे. मला सांगायला इतकं वाईट वाटतं की, जे मराठी मराठी करतात ना तेच स्वत: जास्त लॉबिंग करतात. मग जर तुम्हाला मराठीचा इतका पुळका आहे, तर तुम्ही का दुसऱ्यांचे चित्रपट पोस्ट करत नाही. निवडक लोकांना पाठिंबा का देता? तुम्ही याच्या चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट केला, मग माझ्या का नाही करत? कारण हा मला आवडत नाही, त्यामुळे एकी नाहीये.

“स्वप्नील व मी चांगले मित्र आहोत. आम्ही आता एक ठरवलं आहे की आपण क्रॉस प्रमोशन करूयात. जसे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार करतात. मी त्याच्या फिल्म प्रमोट करतो, स्वप्नील दादा माझ्या फिल्म प्रमोट करतो. मी म्हटलं की कोणी बरोबर येत नाही ना, तर कमीत कमीत आपण करूयात. आपण सुरुवात करूयात, ज्यामुळे लोकांना समजेल की आपल्याला एकत्र यावं लागेल.”

पुढे कांचन अधिकारी यांनी म्हटले की, वर्षातून १०० हून अधिक चित्रपट येतात. १२०-१५० यादरम्यान वर्षाला चित्रपट बनतात, त्यापैकी ६०-७० चित्रपट प्रदर्शित होत नाहीत; ते फक्त चित्रपट बनवतात आणि त्यानंतर काहीच होत नाही. यासाठी सरकाराने छोटे-छोटे थिएटर्स बनवायला पाहिजेत, असे त्यांनी म्हटले.

Story img Loader