मराठी अभिनेता पुष्कर जोग हा ‘जबरदस्त’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे लोकप्रिय ठरला. अभिनयाबरोबरच पुष्कर दिग्दर्शक व निर्माता या जबाबदाऱ्याही पार पाडताना आपल्याला दिसतो. नुकताच ऑस्करचा ९६ वा अकादमी पुरस्कार सोहळा पार पडला. जगभरातील दिग्गज कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सोहळ्यात अनेक कलाकारांना मनोरंजनसृष्टीतील कामगिरीसाठी ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात येते. या वर्षी ‘ओपेनहायमर’ चित्रपटामधील नायकाची भूमिका साकारणाऱ्या सिलियन मर्फीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा सिलियन मर्फी हा पहिला आयरिश अभिनेता आहे. सिलियनच्या या बातमीची पोस्ट नुकतीच पुष्कर जोगने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आणि त्याला कॅप्शन देत पुष्करने लिहिले, “मीही त्याच वाटेवर चालतोय. लवकरच मराठी चित्रपटही ऑस्कर जिंकेल. कदाचित तो चित्रपट माझा असेल किंवा दुसऱ्या कोणाचाही असेल; पण मराठी चित्रपट लवकरच ऑस्कर जिंकेल.”

‘व्हिक्टोरिया’, ‘बाप माणूस’, ‘मुसाफिरा’, ‘अदृश्य’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दिग्दर्शक व अभिनेता या दोन्ही भूमिका पुष्कर जोगने अप्रतिमरीत्या बजावल्या. लवकरच पुष्कर ‘जबरदस्त-२’ची घोषणा करणार आहे. याबाबतची स्टोरी त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. “जबरदस्त-२ या चित्रपटाची कथा मी नुकतीच ऐकली. त्यासाठी मी खूप आनंदी आणि आशावादी आहे,” अशी कॅप्शन त्याने या स्टोरीला दिली.

हेही वाचा… कतरिना कैफचा पोलका डॉट ड्रेसमधील व्हिडीओ होतोय व्हायरल; चाहते म्हणाले, “गुड न्यूज…”

दरम्यान, पुष्करबद्दल सांगायचे झाल्यास, अलीकडेच महापालिकेचे कर्मचारी पुष्कर जोगच्या घरी जातीय सर्वेक्षणासाठी आल्याने त्यावर नाराजी व्यक्त करीत पुष्करने एक संतप्त पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे पुष्कर चर्चेत होता आणि मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाला होता. पुष्करच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास, त्याचा ‘मुसाफिरा’ चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात पुष्कर जोगसह पूजा सावंत, पुष्कराज चिरपुटकर, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pushkar jog said marathi films will win an oscar soon shared cillian murphy won best actor oscar trophy for oppenheimer film dvr