पुष्कर जोग (Pushakar Jog) लवकरच ‘हार्दिक शुभेच्छा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पुष्कर जोगबरोबर अभिनेत्री हेमल इंगळे स्क्रीन शेअर करीत आहे. २१ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबरोबर अभिनेता अनेकदा त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो. मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांमध्ये एकी असायला हवी, असे अनेकदा त्याने म्हटलेले आहे. आता पुष्कर जोगने ओटीटी प्लॅटफॉर्म्स मराठी चित्रपट विकत घेत नाहीत, असे वक्तव्य केले आहे.

मराठी चित्रपटांसाठी पुढचा काळ कठीण

अभिनेता पुष्कर जोगने काही दिवसांपूर्वी ‘नवशक्ती’ला मुलाखत दिली. काही दिवसांपूर्वी एका व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशीने हार्दिक शुभेच्छा व पुष्कर जोगने जिलबी या चित्रपटाचे प्रमोशन केल्याचे पाहायला मिळाले. हे एकमेकांच्या चित्रपटाचे प्रमोशन होते. त्याबद्दल बोलताना पुष्करने म्हटले, “भौगोलिकदृष्ट्या बॉलीवूड हे मुंबईत आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीनं आता खूप वर्चस्व दाखवायला सुरू केलंय आणि मराठी इंडस्ट्रीला महाराष्ट्रातच काही किंमत उरली नाहीये, असा माझा समज आहे. मराठी इंडस्ट्रीत आता काही मोठं झालं नाही, तर मराठी चित्रपटांसाठी पुढचा काळ कठीण आहे. मराठी चित्रपटांनी आता काहीतरी मोठी झेप घेतली पाहिजे. १०० कोटींची फिल्म आली पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे. नाही तर इतके सिनेमे येत आहेत आणि सिनेमे वाईट आहेत का? तर अजिबात नाही. सगळे मराठी निर्माते, दिग्दर्शक उत्तम कलाकृती निर्माण करीत आहेत. उत्तम सिनेमे आहेत. फक्त त्यांना थिएटर्स मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.”

“आम्ही पाडव्याला चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली. तेव्हाच ईद आहे आणि सिकंदर प्रदर्शित होणार आहे. ते सगळं बघून आम्हाला चित्रपट प्रदर्शित करावा लागतो. माझीच मुंबई, माझाच महाराष्ट्र आणि साऊथचा कोणता चित्रपट येणार आहे, हिंदी चित्रपट कोणता येणार आहे, हे बघून आम्हाला ठरवावं लागतं. मला त्याचं फार वाईट वाटतं. मी मुंबईचा आहे, मला महाराष्ट्राच्या लोकांनी प्रेम दिलं. तुमचं मनोरंजन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत; पण आम्हाला ती संधी, तो प्लॅटफॉर्मच नाहीये.”

पुढे अभिनेत्याने म्हटले की, आज ओटीटी मराठी फिल्म्स विकत घेतच नाही; साऊथ इंडियन घेतात. मग तुम्ही म्हणता की, तुम्ही त्या दर्जाचे चित्रपट बनवा. मग आम्ही गुंतवलेले पैसे परत कसे मिळवायचे? तेवढे थिएटर, महसूल, सॅटेलाइट, डिजिटल म्युझिक आहे का? अजिबातच नाही. त्यामुळे स्वप्नीलदादा व मी, आम्ही ठरवलं की, असं काहीतरी करूयात. जो चित्रपट असेल, त्याचं क्रॉस प्रमोशन करू.

दरम्यान, हार्दिक शुभेच्छा या चित्रपटात पुष्कर व हेमलसह विशाखा सुभेदार, अभिजीत चव्हाण, विजय पाटकर, पृथ्वीक प्रताप, अनुषा सरकटे, किशोरी आंबिये हे कलाकार दिसणार आहेत. त्याबरोबरच कोक या हिंदी चित्रपटातून पुष्कर जोग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader