Marathi Actor Pushkar Jog : सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीच्या सणानिमित्त आनंदाचं वातावरण आहे. घराघरांत मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो. दिवाळी म्हटलं की फटाके, रांगोळी, रोषणाई आणि सर्वत्र फटाक्यांची आतषबाजी पाहायला मिळते. आपण मोठ्या आनंदाने, उत्साहात मोठमोठे फटाके फोडतो. मात्र, या फटाक्यांमुळे अनेकदा मुक्या जनावरांना त्रास सहन करावा लागतो.
दिवाळीत काहीजण पाळीव प्राण्यांच्या जीवाशी खेळतात. कुत्र्यांच्या शेपटीजवळ फटाके लावणं हा यातलाच एक प्रकार…त्यामुळे प्राणीप्रेमींनी कमीत कमी फटाके वाजवून ध्वनी प्रदूषण टाळा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना इजा होणार नाही अशी दिवाळी साजरी करा असं आवाहन केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुष्कर जोगने पोस्ट शेअर केली आहे.
पुष्कर जोगची पोस्ट चर्चेत
मराठी कलाविश्वात पुष्करने आपला एक वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे. ‘बिग बॉस’च्या पहिल्याच सीझनचा तो उपविजेता ठरला होता. सोशल मीडियावर अभिनेता नेहमीच सक्रिय असतो. न पटणारे मुद्दे तसेच सामाजिक विषयांवर पुष्कर नेहमीच स्पष्टपणे आपलं मत मांडत असतो.
पुष्कर ( Pushkar Jog ) लिहितो, “जर कोणी मला कुत्र्यांच्या शेपटीजवळ फटाके लावताना दिसलात, तर मी स्वत: येऊन तुमच्या चXच्या आत सुतळी बाँब टाकेन…कृपया अशी विकृती करू नका. पाळीव प्राण्यांची काळजी घ्या…ते लोक फार घाबरतात. #जोगबोलणार”
पुष्करप्रमाणे ( Pushkar Jog ) पूजा सावंतने देखील फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं आहे. “आपलाच सण आहे… आपणच साजरा करायचा आहे फक्त भान ठेऊयात की कोणत्याही प्राण्याला आपल्यामुळे इजा होणार नाही. एवढं कर करूच शकतो आपण… फटाके फोडून प्राण्यांना त्रास देऊ नका. Say No to Crackers” असं पूजाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.